जिल्ह्यातील ४२३ महत्त्वाच्या ठिकाणी पाेलीस विभागाने बसविले ‘क्यूआर काेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:22 IST2021-02-28T05:22:18+5:302021-02-28T05:22:18+5:30
सदरची संकल्पना राबविण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीकडून ॲप स्वीकारून वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची हद्द, महत्त्वाची ठिकाणे जसे बँक, ...

जिल्ह्यातील ४२३ महत्त्वाच्या ठिकाणी पाेलीस विभागाने बसविले ‘क्यूआर काेड’
सदरची संकल्पना राबविण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीकडून ॲप स्वीकारून वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची हद्द, महत्त्वाची ठिकाणे जसे बँक, एटीएम सेंटर, सराफा बाजार, प्रार्थनास्थळे आदी महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर काेड (क्विक रिस्पाॅन्स प्रणाली) बसविण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार असे एकूण २६ अंमलदार यांना गस्ती दरम्यान याचा वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. जेणेकरून पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या ॲण्ड्राइड मोबाइलमधील ॲपद्वारे क्यूआर काेड स्कॅन करून त्यांनी किती ठिकाणी व केव्हा भेट दिली याबाबत अहवाल नियंत्रण कक्ष अधिकारी वाशिम यांना समजेल. नियंत्रण कक्ष अधिकारी हे संगणकीकृत अहवाल एकत्रित पोलीस अधीक्षक यांना सादर करू शकतील. अशा प्रकारे गस्तीदरम्यान कोणतेही संवेदनशील ठिकाण सुटणार नाही. यामुळे गस्तीवरील कर्मचाऱ्यांचे लाइव्ह लोकेशन नियंत्रण कक्ष अधिकारी यांना समजेल. याने पेपरवर्क कमी होईल व नियंत्रण कक्ष अधिकारी हे नियंत्रण कक्षात बसून मॉनटरिंग करू शकतील. त्यामुळे जनतेस महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस अंमलदार हे जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालताना दिसून येतील.
पोलीस अधीक्षक वसंत परेदशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाजी ठाकरे व संगणक कक्षाचे प्रभारी अंमलदार अमोल काळमुंदळे यांनी जिल्ह्यात महत्त्वाच्या एकूण ४२३ ठिकाणी क्यूआर काेड बसविले आहेत.
.....
६२१ डिजिटल ओळखपत्रे वाटप
वाशिम जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार हे नवीन संगणक युगानुसार स्मार्ट पोलीस दिसावे याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना एकूण ६२१ डिजिटल ओळखपत्रे वाटप केली आहेत. आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातील एकूण १३ पोलीस स्टेशनपैकी ७ पोलीस स्टेशनला डिजिटल ओळखपत्रे वाटप झाली असून उर्वरित पोलीस स्टेशन येथील अधिकारी, अंमलदार यांना लवकरच डिजिटल ओळखपत्रे वाटप होणार आहेत.