पालखी रस्ता ठरत आहे धोकदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:28 IST2021-07-20T04:28:26+5:302021-07-20T04:28:26+5:30
राजुरा : संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत ...

पालखी रस्ता ठरत आहे धोकदायक
राजुरा : संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. सुकांडा गावा नजीक रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी नाल्यावर खोदण्यात आलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना सुरक्षा कठडेच नसल्याने हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा धोकादायक ठरत आहे.
श्री क्षेत्र संत नगरी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. काम पूर्णत्वाचा कालावधी संपल्यानंतरही अद्यापही काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालक तथा पादचाऱ्यांसह शेतकरी बांधवांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. तीन वर्षाच्या कालावधीत मेडशी ते नाथनगरी श्री.क्षेत्र डव्हा या अकरा कि.मी. अंतराचे रस्त्यावर संबंधित ठेकेदाराकडून केवळ दगड मुरुमांचा भरावाच टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सद्य:स्थितीत या रस्त्यावर चिखल, पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरून दुचाकी तथा चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
००००००
कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नाही
ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहे. या खड्ड्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे उभारण्यात न आल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या कामानजीक वाहनांसाठी वळण रस्ताच बनवण्यात आला नसल्याने वाहनधारकांना रस्त्याच्याकडेवरुन चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकांची वाहने फसत आहेत. ब्राह्मणवाडा ते सुकांडा गावातील शेतकरी बांधवांना शेती कामासाठी चिखलाचे साम्राज्य असलेला हा रस्ता अत्यंत त्रासदायक ठरत आहे. फुलाचे कामासाठी नाल्यावर खोदण्यात आलेले मुरूम व दगड व्यवस्थित न टाकल्याने नाल्यामध्ये पुराचे पाणी साचून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे.
००००
मेडशी ते डव्हा या पालखी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत अनेकदा लेखी निवेदन दिले. परंतु त्याकडे संबंधितांकडुन दुर्लक्ष करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या रस्त्यावर फुलांसाठी खोदून ठेवलेले खड्डे धोकादायक ठरत आहेत.
कैलासराव घुगे
सरपंच सुकांडा