स्वच्छतेसाठी रोज एक तास देण्याची कर्मचा-यांची शपथ
By Admin | Updated: October 3, 2014 00:32 IST2014-10-03T00:32:02+5:302014-10-03T00:32:02+5:30
गांधी जयंतीनिमित्त वाशिम जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम.

स्वच्छतेसाठी रोज एक तास देण्याची कर्मचा-यांची शपथ
वाशिम : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत आज गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयासह जि. प. परिसराची स्वच्छता करुन स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग नोंदविला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी जि. प. च्या वसंतराव नाईक सभागृहात उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचार्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे जिल्हा आरोग्य अधिकारी एम. एस. बायस, शिक्षण अधिकारी पेंदोर यांची उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत स्तरावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गांधी जयंतीनिमित्त एरवी सर्व शासकीय कर्मचारी सुट्टीचा आनंद घेत असतात. आज मात्र सकाळी ९.00 वाजताच जि. प. चे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर होते. आपल्या कार्यालयाचा परिसर व फर्निचर आदींची साफसफाई करून या अभियानांतर्गत निर्मल कार्यालय उपक्रम राबविण्यात आला. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सर्व कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. सकाळी १0 वाजता सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अति. मुकाअ. डॉ. पवार यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे यांनी संचालन केले. यानंतर या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी सुमारे एक तास जिल्हा परिषदेसमोरील गाजर गवत उपटून परिसराची स्वच्छता केली.