एकूण ज्येष्ठांपैकी केवळ ११ टक्के लोकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:30+5:302021-03-22T04:37:30+5:30
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २० मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ हजार ५८९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला ...

एकूण ज्येष्ठांपैकी केवळ ११ टक्के लोकांनी घेतली लस
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात २० मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ हजार ५८९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १७२ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर १० हजार ८०२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तसेच १६१४ व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी शासकीय केंद्रात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यात १ मार्चपासून २० मार्चपर्यंत केवळ १० हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. प्रत्यक्षात ६० वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तथापि, लसीकरणाला त्यांचा प्रतिसाद लाभत नसून, अनेक व्यक्ती कोरोना संसर्गामुळे प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होत आहेत.
------------
जिल्हाधिकाऱ्यांची जनतेला साद
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यानंतरच रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यात काही रुग्ण चिंताजनक परिस्थितीत दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह साधा, ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधुमेह, फुप्फुसांचे आजार, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तातडीने कोरोना चाचणी करावी, तसेच कोरोनाची लस सुरक्षित असून, ती ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्तांनी घ्यावी, अशी साद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
------------
चाचणी, लसीकरण वाढविण्यासाठी सरपंचांना पत्र
जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांतच ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तथापि, ग्रामीण भागांतून कोरोना चाचणी करण्यासह लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सरपंचांना एक पत्र देऊन त्यांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ६० वर्षे वयाच्या दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्तरीय समितीला सक्रिय करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
---------
शासकीय लसीकरण केंद्र -४०
खासगी लसीकरण केंद्र - ७
---------
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक - १,८०,०००
लस घेतलेले ज्येष्ठ नागरिक -१०,०००
-----------
कोरोना संसर्गाची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह - १२५८९
अॅक्टिव्ह - १६१४
बरे झालेले - १०८०२
मृत्यू - १७२