दारु विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश
By Admin | Updated: April 25, 2015 02:22 IST2015-04-25T02:22:11+5:302015-04-25T02:22:11+5:30
दुकान तपासणीच्या सूचना; विक्रेत्यांकडून स्टिंगची दखल.

दारु विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश
वाशिम : देशी-विदेशी दारू विक्रेते अल्पवयीन मुलांना दुकानामधून दारूच्या बाटलीची सर्रास विक्री कशी करतात, याचे कारनामे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने २४ एप्रिल रोजी चव्हाट्यावर आणताच, दारू विक्रेते आणि वाशिमच्या उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली. या स्टिंगची दखल घेत २४ एप्रिल रोजी विक्रेत्यांनी बालकांना दुकानांमध्ये प्रवेश नाकारले तर उत्पादन शुल्क विभाग वाशिमच्या अधीक्षकांनी दुकानांच्या तपासण्या करण्याच्या सूचना कर्मचार्यांना दिल्या. देशी-विदेशी दारू दुकानांमधून १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दारू बाटलीची विक्री कदापिही करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी जिल्हा उत्पादन शुल्क विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात कितपत होत आहे, याची पडताळणी करण्यासाठी २३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील काही देशी-विदेशी दारू दुकानांमध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. दारू दुकानांमध्ये कोणतीही चौकशी न करता, मागणी केल्यानुसार मुलांना हवी ती दारूची बाटली बिनधास्त दिली जात असल्याची बाब रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर व कारंजा शहरातील काही दारू दुकानांमध्ये स्टिंगने चव्हाट्यावर आणली होती. या वृत्ताची दखल घेत विक्रेत्यांनी २४ एप्रिल रोजी बालकांना दुकानांमध्ये प्रवेश नसल्याचे सांगितले. ह्यलोकमतह्ण प्रतिनिधींनी रिसोड, वाशिम व मंगरुळपीर शहरातील काही दुकानांमध्ये बालकांना २४ एप्रिल रोजी पाठविले होते; मात्र विक्रेत्यांनी या बालकांना दुकानात प्रवेश नसल्याचे सांगितले. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक डी.जी. माळी यांनीदेखील दुकानांच्या तपासण्या करण्याचे आणि गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश कर्मचार्यांना दिले.