उघड्यावर शौचास जाणाऱ्याविरुध्द होईल कारवाई!
By Admin | Updated: May 25, 2017 19:58 IST2017-05-25T19:58:36+5:302017-05-25T19:58:36+5:30
मानोरा नगर पंचायत : गुडमॉर्निंग पथक सक्रीय

उघड्यावर शौचास जाणाऱ्याविरुध्द होईल कारवाई!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : स्वच्छता भारत मिशन, ग्रामस्वच्छता अभियानामार्फत घरोघरी शौचालयाची सक्ती केली जात असतांना अनेक गावात उघड्यावर शौचास जाणारांचे प्रमाण बरेच आहे. अशा लोकांवर कारवाई करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे सर्वत्र गुडमॉर्निंग पथक सक्रीय झाले आहे. मानोरा नगर पंचायतीेने सुध्दा हे पथक सक्रीय केले असून अशा लोकांना समज देणे सुरु केले असून यापुढे कारवाई केल्या जाणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना सूचना केल्या आहेत.
नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल माळकर यांचे सुचनेवरुन न.प.चे कर्मचारी सक्रीय झाले आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज देण्यात आली. उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र व इतर योजना रद्द होणार आहे. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे, बंडू तेलकुंटे, प्रमोद ढोरे, सुखदेव लवटे, आदि कर्मचारी गुडमॉर्निंग पथकात आहेत. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती आदि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावतीने हागणदारीमुक्त ग्रामसाठी मोठया प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत. त्यानुसार मानोरा न.प.सुध्दा सक्रीय झाली आहे.
शासनाच्यावतीने हागणदारीमुक्ती साठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.नगर पंचायतच्यावतीने कार्यवाही सुरु आहे.ज्यांचे घरी शौचालय नाही, त्यांचे राशन बंद केले जाणार आहे, तेव्हा नागरिकांनी शौचालय बांधुन त्यांचा वापर करावा.
- अमोल माळकर, मुख्याधिकारी, मानोरा