उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री घातक
By Admin | Updated: November 2, 2016 15:49 IST2016-11-02T14:28:28+5:302016-11-02T15:49:29+5:30
वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून तयार खाद्यपदार्थांची सर्रासपणे उघड्यावर विक्री होत आहे.

उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री घातक
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २ - जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून तयार खाद्यपदार्थांची सर्रासपणे उघड्यावर विक्री होत आहे. विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कसलही दक्षता घेण्यात येत नसल्याने या ठिकाणी येणा-या ग्राहकांच्या आरोग्याला एकप्रकारे धोकाच आहे.
मागील काही दिवसांपासून धकाधकीच्या जीवनात लोकांना धावत पळत काम करताना शांत बसून घरी जेवण घेणे कठीण होऊ न बसले आहे. अशात अनेक लोक बाहेर उपाहारागृहात बसून, फरसाण, भजे, आलूवडे, पोहे आदि पदार्थ खाऊन वेळ मारून नेतात. याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे विक्रेत्यांची संख्याही तेवढीच वाढली आहे. त्यातच मागील काही वर्षांत पाणीपुरी खाण्याचे फॅडच झाले आहे. पाणीपुरीची विक्री करणारे काही व्यावसायिक ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत असले तरी, अनेक पाणी पुरी विक्रेत वाटेल तेथे टपरी थाटून पाणीपुरीचा व्यवसाय करतात. अगदी रस्त्याच्या कडेला घाण कचरा असलेल्या ठिकाणीही या टप-या आहेत. या ठिकाणी भेळ आणि इतर नाश्त्याचे पदार्थही मिळतात. हे सर्व पदार्थ उघड्यावरच ठेवण्यात येत असल्याने त्यावर परिसरातील घाणीवरच्या माशा बसतात. त्यामुळे या ठिकाणी पाणीपुरी खाणारे आणि नाश्ता करणा-यांच्या आरोग्याला एक प्रकारचा धोकाच आहे.