गारपिटीने बिजवाई कांदा, मूग, पपई भुईसपाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:31+5:302021-03-21T04:40:31+5:30
गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात सोंगून ठेवलेल्या व काही ठिकाणी काढणीच्या प्रतीक्षेत ...

गारपिटीने बिजवाई कांदा, मूग, पपई भुईसपाट!
गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात सोंगून ठेवलेल्या व काही ठिकाणी काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अशातच १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक मेघ भरून येत ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. यादरम्यान ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने सोसाट्याचा वारा सुटला व जोरदार स्वरूपात गारपीट झाली. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील शेकडो एकरावर बहरलेला बिजवाई कांदा क्षणात भुईसपाट झाला. यासह उन्हाळी मूग, पपई, टरबूज, आंबा व अन्य फळपिके, भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले असून महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे तत्काळ सर्वेक्षण करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
....................................
कोट :
वाशिम तालुक्यातील चिखली परिसरात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मूग आणि बिजवाई कांदा पेरलेला आहे. पोषक वातावरणामुळे हे पीक चांगलेच बहरले होते. अशात शुक्रवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
- दिलीप मुठाळ
चिखली, ता. वाशिम.
...........
मोतसावंगा, निंबी येथे शेतकऱ्यांनी बिजवाई कांद्याची लागवड केली असून, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी हे पीक बहरले आहे. पिकाची स्थितीही उत्तम होती; मात्र गारपिटीने कांदा भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- रामराव टोपले
निंबी, ता. मंगरुळपीर.
............
कोट :
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विशेषत: उन्हाळी मूग, पपई, आंबा, टरबूज, भाजीपाला पिके व बिजवाई कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने सर्वेक्षण व नुकसानाचे पंचनामे केले जातील.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम