वाशिम : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या डव्हा फाट्यानजीक २६ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेदरम्यान ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, खिर्डा येथील दिगंबर लक्ष्मण लठाड (३२) हा शेतमजूर आपल्या मुलासह मालेगाववरून खिर्डा येथे एम.एच. ३० एम. ३८९० या क्रमांकाच्या दुचाकीने घरी येत होता. यादरम्यान शेलुबाजारवरून मालेगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एम.एच. ३४ बी.जी. २७८८ क्रमांकाच्या ट्रकने डव्हा फाट्यानजीक दिगंबर लठाड यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात लठाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगाही या घटनेत जखमी झाला. जऊळका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अपघातानंतर बराच वेळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वृत्त लिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.