मुरूमाच्या ढिगाराला दुचाकी धडकून एकजण ठार
By सुनील काकडे | Updated: August 11, 2023 18:47 IST2023-08-11T18:46:48+5:302023-08-11T18:47:09+5:30
११ ऑगस्ट रोजी सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

मुरूमाच्या ढिगाराला दुचाकी धडकून एकजण ठार
वाशिम : जिल्ह्यातील मेडशीनजिक अकोला-वाशिम बायपासवर निर्माणाधिन रस्त्यावर टाकलेल्या मुरूमाच्या ढिगाराला धडकून दुचाकीस्वार इसम ठार झाल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, नजिकच्या जऊळका रेल्वे येथील रहिवासी गोपाळ साधुराम धोंगडे (३६) हा वाकळवाडी येथे त्याच्या नातेवाईकाकडे गत आठ दिवसांपासून ट्रॅक्टरने पिकांवर औषध फवारणीच्या कामासाठी गेला होता. १० ऑगस्ट रोजी तो काम आटोपून वाकळवाडी येथून जऊळका येथे एम.एच. ३७ एस ६४९६ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने जात असताना रात्री ७ वाजताच्या सुमारास मेडशी येथील अकोला-वाशिम बायपास मार्गावर वाहतूकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावरील मुरूमाच्या ढिगाराला वाहन धडकून गोपाळ धोंगडे हा जागीच ठार झाला.
११ ऑगस्ट रोजी सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.