ओंकारगीर बाबा पुण्यतिथी यंदाही साध्या पद्धतीनेच साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:32+5:302021-08-01T04:38:32+5:30
दरवर्षी संत ओंकारगीर बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र २०२० पासून कोरोना संसर्गामुळे पुण्यतिथी सोहळा अतिशय ...

ओंकारगीर बाबा पुण्यतिथी यंदाही साध्या पद्धतीनेच साजरी
दरवर्षी संत ओंकारगीर बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र २०२० पासून कोरोना संसर्गामुळे पुण्यतिथी सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यंदाही ३१ जुलै शनिवार रोजी ओंकारगीर बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थानमधील सर्वच मंदिरे फुलांनी सजविण्यात आली. सकाळी पाच वाजतापासून पुण्यतिथीनिमित्त संस्थानच्या वतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत ओंकारगीर बाबा यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजन व आरती करून संस्थानमधील मंदिराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. वरील सर्व कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जारी नियम पाळत राहून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. -----------
दोन वर्षांपासून कार्यक्रमांवर मर्यादा
शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये २०१९ पर्यंत दरवर्षी ओंकारगीर बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत होती. पुणयतिधी सोहळ्यानिमित्त २१ क्विंटल बुंदी, ३१ क्विंटल काशीफळाची भाजी, ५१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या तयार करून महाप्रसाद वितरण करण्यात येत होता. मात्र दोन वर्षांपासून संस्थानमधील सगळेच उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात येत आहेत.