नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:29+5:302021-09-06T04:45:29+5:30

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत शनिवारी दाखल झाले असून, प्रतिक्विंटल ८,२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ...

Older soybeans are cheaper than new ones! | नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

नव्यापेक्षा जुने सोयाबीनच खातेय भाव!

वाशिम : नवीन सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत शनिवारी दाखल झाले असून, प्रतिक्विंटल ८,२८१ रुपये दर मिळाला आहे. जुन्या सोयाबीनला ९,४०० रुपये दर असल्याने नवीनच्या तुलनेत जुने सोयाबीनच भाव खात असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्पभूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की, बाजार समितीत विक्रीसाठी आणतात. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल, या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ४००० या दरम्यान प्रतिक्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. गत महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात चढउतार पाहावयास मिळत आहे. आता नवीन सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. वाशिमच्या बाजार समितीत शनिवार, ४ सप्टेंबर रोजी नवीन सोयाबीन विक्रीसाठी आले. यावेळी या सोयाबीनला प्रतिक्विंटल ८,२८१ रुपये भाव मिळाला. दुसरीकडे जुन्या सोयाबीनला मात्र ९,४०० रुपये भाव मिळाला. नवीन सोयाबीन बाजार समितीत येत असल्याने हाच भाव कायम राहील का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

०००००

भाव गडगडण्याची शक्यता

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने बाजारभाव गडगडण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. बाजारभाव गडगडले तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

०००००००००००००

शेतकरी म्हणतात बाजारभाव कायम राहावे.

कोट

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. आता सोयाबीन तयार होत असल्याने यापूर्वी असलेले बाजारभाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, बाजारभाव पुन्हा गडगडतील, अशी दाट शक्यता आहे.

- पांडुरंग सोळंके

प्रगतशील शेतकरी

००००

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांमधून जावे लागते. शनिवारी बाजार समितीत नव्या सोयाबीनला आठ हजारांंवर भाव मिळाला. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. परंतु, हाच भाव यापुढेही कायम राहिला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

- संजयकुमार सरनाईक

प्रगतशील शेतकरी

Web Title: Older soybeans are cheaper than new ones!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.