वृद्ध महिलेची दिशाभूल करुन पळवून नेले
By Admin | Updated: February 5, 2015 01:18 IST2015-02-05T01:18:33+5:302015-02-05T01:18:33+5:30
पोलिसांत तक्रार ; आरोपीस अटक.

वृद्ध महिलेची दिशाभूल करुन पळवून नेले
वाशिम : तालुक्यातील पार्डी टकमोर येथील एका वृद्ध महिलेची दिशाभुल करून तिला पळवून नेल्याची तक्रार वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या मुलाने २ फेब्रुवारी रोजी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पार्डी टकमोर येथील एका वयोवृद्ध महिलेचा मुलगा डिगांबर मुकिंदा कांबळे याच्या नावाने शासनाकडून १५ हजाराचा धनादेश मिळाला होता. डिगांबर हा अनेक महिन्यांपासून पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास असल्याने अधुन-मधुनच डिगांबर गावामध्ये येत असतो. शासनाकडून मिळालेला धनादेश वटविण्यासाठी वृद्ध महिलेला मिळालेल्या खासगी सल्ल्यानुसार ग्रामीण बँकेमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रतिज्ञापत्रात महिलेने लाभार्थी मुलगा डिगांबर हा गेल्या २0 वर्षांपासून बेपत्ता असल्याचा उल्लेख करून सदर धनादेशाची रक्कम आई या नात्याने मला मिळावी, असा प्रतिज्ञा लेख बॉण्डवर लिहून दिला. यासोबत त्यांनी लाभार्थी मुलाची आई असल्याचे कागदपत्रे जोडली. हा सर्व बनावट प्रकार वृद्ध महिलेकडून करून घेण्यासाठी मनोहर ढोले याने प्रोत्साहित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गेल्या २ फेब्रुवारीपासून वृद्ध महिला शेवंताबाई कांबळे या घरी न आल्याने त्यांच्या मुलाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. या तक्रारीहून पोलिसांनी मनोहर ढोले याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली व त्याची चौकशी करीत आहे. तसेच बेपत्ता असलेल्या शेवंताबाईचा शोध ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार परदेसी यांच्या मार्गदर्शनखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.