‘शेतकरी संघर्ष’चे पदाधिकारी - ठाणेदारांत शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:51+5:302021-08-26T04:43:51+5:30
राज्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या शंकरपट सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, गोवंश व पशुधनाचे संरक्षण व्हायला हवे, ...

‘शेतकरी संघर्ष’चे पदाधिकारी - ठाणेदारांत शाब्दिक चकमक
राज्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या शंकरपट सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, गोवंश व पशुधनाचे संरक्षण व्हायला हवे, ग्रामीण व शेतीविषयक परंपरांचे जतन व्हावे, गतवर्षी पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाईस पात्र शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र; परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्षात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्यात यावी, शेतीविषयक वैयक्तिक लाभाच्या योजनांचे रखडलेले अनुदान विनाविलंब अदा करावे आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटना व बैलगाडा मालक-चालक संघटनेने २५ ऑगस्ट रोजी वाशिम शहरातील शिवाजी चाैकापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते.
ठरल्यानुसार, बुधवारी सकाळी शेतकरी संघर्ष संघटना आणि बैलगाडी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी चाैकात जमले; मात्र तत्पूर्वी वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी संघटनेच्या अकोला नाका चाैकस्थित कार्यालयात पोहचून पदाधिकाऱ्यांशी नाहक वाद घातला. असभ्य वर्तणूक केली. तसेच सुमारे २० पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नवीन पोलीस मुख्यालयात आणले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश केडके यांनी मध्यस्थी करून नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मोर्चाला परवानगी दिली. त्यामुळे ठाणेदारांचा निषेध नोंदवून शिवाजी चाैकातून मोर्चा मार्गस्थ झाला, अशी माहिती शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश आढाव यांनी दिली.
.............
कोट :
शेतकरी संघर्ष संघटनेचा बैलगाडी मोर्चा पूर्वनियोजित होता. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश केडगे यांच्याशी चर्चा करून त्यास परवानगी मिळविली होती; मात्र मोर्चा निघण्यापूर्वीच वाशिम शहर ठाणेदार ध्रुवास बावनकर यांनी संघटनेच्या कार्यालयात येऊन आपल्याशी वाद घातला. असभ्य वर्तणूक केली. संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांना स्थानबद्ध केले. अशा ठाणेदारांची तत्काळ हकालपट्टी व्हावी या मागणीसाठी लवकरच आंदोलन छेडले जाईल.
- राजू वानखेडे
संस्थापक अध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना
......................
कोट :
उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी शेतकरी संघर्ष संघटनेच्या बैलगाडी मोर्चास परवानगी नाकारली होती. त्यामुळे त्यांच्या व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश केडगे यांच्या आदेशाचे पालन करून २५ ऑगस्ट रोजी सकाळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य अशा १८ लोकांना स्थानबद्ध केले. त्यांच्याशी कुठलाही वाद घातला नाही किंवा असभ्य वर्तणूक केलेली नाही.
- ध्रुवास बावनकर, ठाणेदार, वाशिम