शासकीय घरकुलातील जुगार अड्डय़ावर छापा
By Admin | Updated: April 10, 2016 01:31 IST2016-04-10T01:31:39+5:302016-04-10T01:31:39+5:30
वाशिम येथील घटना.

शासकीय घरकुलातील जुगार अड्डय़ावर छापा
वाशिम: शासकीय दूध डेअरी परिसरात असलेल्या घरकुलामधील जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ८:३0 वाजता छापा टाकला. या छाप्यामध्ये आठ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५२ पत्त्यासह २३ हजार ८0 रुपये जप्त केले. काटा मार्गावर असलेल्या शासकीय दूध डेअरी परिसरात नगर परिषदेचे शासकीय घरकुलाचे निवासस्थान आहे. या घरकुलामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.बी. तडवी यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर तडवी यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांचे मार्गदर्शनात संशयीत घरकुलामध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी विठ्ठल रामभाऊ मुरकुटे, संतोष कैलास इंगळे, मिलिंद भीमराव घुगे, राजू सत्यनारायण अग्रवाल, देवीदास विठ्ठल जटाळे (सर्व रा. वाशिम), विकास विलास घुगे (रा. एरंडा ता. मालेगाव जि. वाशिम), अमोल माधवराव धोंगडे (रा. ब्रम्हा ता.जि. वाशिम), संतोष काशिराम काजळे (रा. काजळंबा ता.जि. वाशिम) यांच्याकडून ५२ ताशपत्त्यासह रोख २३ हजार ८0 रुपये जप्त केले. उपरोक्त सर्व आरोपींविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई जुगार अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.