ओट्यावर व्यापा-यांचाही शेतमाल !
By Admin | Updated: March 9, 2017 02:02 IST2017-03-09T02:02:48+5:302017-03-09T02:02:48+5:30
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये ओट्यावर व्यापा-याच्या मालास जागा मिळत असून, शेतक-यांचा शेतमाल शेडबाहेर ठेवण्यात येतो.

ओट्यावर व्यापा-यांचाही शेतमाल !
वाशिम, दि. ८- जिल्ह्यातील काही बाजार समितीमधील ओट्यांवर व्यापार्यांचाही शेतमाल मोठय़ा प्रमाणावर ठेवला जात असल्याचे बुधवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले.
जिल्ह्यात रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याशिवाय उपबाजारही आहेत. यावर्षी तूरीची आवक प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. मध्यंतरी बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी समोर आली. या पृष्ठभूमीवर रिसोड, वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले. नाफेड केंद्रांवर प्रमाणापेक्षा जास्त तुरीची आवक वाढल्याने हा शेतमाल ठेवण्यासाठी गोदाम अपुरे पडले. परिणामी, नाफेडची खरेदी केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली. पर्यायाने आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली आहे. बाजार समितीमधील ओट्यांवर शेतकर्यांप्रमाणेच व्यापार्यांचाही शेतमाल ठेवला जात आहे. यामुळे विक्रीसाठी आणलेला शेतमाल ओट्याच्या बाजूला खाली ठेवण्याची वेळ शेतकर्यांवर आली.
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेड व ओट्यांची व्यवस्था आहे; मात्र या ओट्यांवर शेतकर्यांप्रमाणेच व्यापार्यांचा शेतमालही ठेवला जातो. परिणामी, आवक वाढली की शेतकर्यांचा शेतमाल ओट्याखाली अर्थात जेथे जागा मिळेल तेथे ठेवला जातो. व्यापार्यांसाठी स्वतंत्र गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकर्यांकडून शेतमाल खरेदी केल्यानंतर काही दिवस ओट्यांवरच व्यापार्यांचा शेतमाल ताडपत्रीने झाकून ठेवला जातो.