कंटेनमेंट झोनची संख्या वाढली, जिल्ह्यात १६७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:11+5:302021-03-19T04:41:11+5:30

जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ६६६३ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. ही संख्या १८ मार्च रोजी ११,८९२ वर पोहोचली. ...

The number of containment zones increased to 167 in the district | कंटेनमेंट झोनची संख्या वाढली, जिल्ह्यात १६७

कंटेनमेंट झोनची संख्या वाढली, जिल्ह्यात १६७

जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ६६६३ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. ही संख्या १८ मार्च रोजी ११,८९२ वर पोहोचली. अर्थात, गत अडीच महिन्यांत ५२२९ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कठोर उपाययोजनाही केल्या जात आहेत. त्यात कोरोनाबाधितांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत असताना त्याचे पालन पूर्णपणे होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर गुन्हा दाखल केला जात आहे. शिवाय, बाधितांच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवले जात असले तरी, त्यांचा इतरांशी संपर्क होऊ नये आणि त्यांनी दक्षता बाळगावी म्हणून बाधितांच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या वाढत असल्याने एकाच वेळी सर्व ठिकाणी लक्ष ठेवताना ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीसह प्रशासनाची दमछाक होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १६७ कंटेनमेंट झोन झाले आहेत.

------------------------

पोलिसांची पेट्रोलिंग

वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बाधितांच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोनमध्ये टाकला जात आहे. लॉकडाऊनच्या काळाच्या तुलनेत आता कंटेनमेंट झोनचा परिसर कमी झाला आहे. शिवाय, या ठिकाणी नियमित पोलीस कर्मचारी, अंगणवाडीसेविकांना ठेवले जात नाही; परंतु नियमांचे पालन होत आहे की नाही, त्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित भागातील बीट जमादारांना त्यांच्या सहका-यांसह या ठिकाणी दिवसातून किमान तीन वेळा फेरी मारावी लागते.

------------------------

धनज बु. येथे सर्वाधिक ‘कंटेनमेंट झोन’

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही ग्रामीण भागात जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या धनज बु. येथे गत दीड महिन्यात कोरोना संसर्गाचा कहरच होत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी येथे व्यापक उपाययोजना केल्या जात असून, त्यात ३२ बाधित व्यक्तींच्या घराचा परिसर कंटेनमेंट झोनमध्ये टाकण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

------------------------

तालुकानिहाय कंटेनमेंट झोन

तालुका कंटेनमेंट झोन

वाशिम ६१

मालेगाव ३९

मं.पीर १७

कारंजा ४२

रिसोड ०६

Web Title: The number of containment zones increased to 167 in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.