आता प्रचारयात्रा मतदाराच्या दारात
By Admin | Updated: October 12, 2014 02:02 IST2014-10-12T02:02:44+5:302014-10-12T02:02:44+5:30
कांरजा विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक्स रथाचा वापर जाहिरातीसाठी व प्रचारासाठी.

आता प्रचारयात्रा मतदाराच्या दारात
डॉ.दिवाकर इंगोले/कारंजा
कारंजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या एका आठवड्यावर आली.प्रभावी व परिणामकारक प्रचारासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे व प्रचार तोफा वातावरण निर्मितीसाठी सक्रिय झाल्या आहेत. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार विविध वाहनांमधून ध्वनीक्षेपकावरून सुरू आहे. काही राजकीय पक्षांनी इलेक्ट्रॉनिक्स रथाचा वापर जाहिरातीसाठी व प्रचारासाठी केला आहे. अगदी प्रचार सभेची अनुभूती व्हावी असे दृश्य या रथातून दिसते.
प्रचाररथात केंद्रिय व प्रादेशिक नेतृत्वाचे छायाचित्रे लावली आहेत. रथ अगदी लहान-सहान वार्डातून फिरतो आहे. अनेक व्यक्ती आणि संस्था मतदान करण्यास मतदारांना प्रवृत्त करीत आहेत. विविध सभा व कार्यक्रमातून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांचे गट तयार केले आहेत. महिला व पुरूषांचे प्रचारगट अगदी मतदारांच्या दारापर्यंत जाऊन आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहे. या मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिप-बमसं , मनसे, बसपा अशा महत्वपूर्ण पक्षांच्या उमेदवारांमध्ये सामना होत असला तरी कोणत्याही राजकीय पक्षाचे चित्र अगदी स्वच्छ व स्पष्ट झाले नाही. संबंध विधानसभा मतदारसंघात रोज नवीन नावाची चर्चा आहे. सध्या बहुरंगी लढती आहेत. राजकीय पक्षाचा राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील अजेंडा हाच प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पक्षांनी तयार करून दिलेल्या घोषणा व प्रचारगीत ध्वनीप्रेक्षकावरून प्रसारित केले जाते. महिला कार्यकर्त्या महिलांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे. पुरूष कार्यकर्त्यांचे गटही असेच प्रत्येक वार्डात फिरून घरोघरी प्रचार करीत आहेत.अपक्ष उमेदवारांची प्रचार यंत्रणा देखील विजयादशमीनंतर सक्रीय झाली आहे. अपक्ष उमेदवार त्यांच्या छापील निवेदनातून मतदारांना आवाहन करीत आहेत. अपक्ष उमेदवारांनी स्थानिक उमेदवारी ,स्थानिक अस्मिता आणि सामाजिक विकासाकडे झालेले दुर्लक्ष आदी मुद्दे त्यांच्या निवेदनात घेतले आहेत. या मतदारसंघाचा निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.