आता शेतकरीच करणार ई-पीक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:28+5:302021-08-25T04:46:28+5:30
आजवर महसूल विभागाचे तलाठी प्रत्यक्ष पाहणी करूनच गाव नमुना ७ व १२ मध्ये विविध पिकांच्या नोंदी करत होते. या ...

आता शेतकरीच करणार ई-पीक पाहणी
आजवर महसूल विभागाचे तलाठी प्रत्यक्ष पाहणी करूनच गाव नमुना ७ व १२ मध्ये विविध पिकांच्या नोंदी करत होते. या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असे. परंतु अनेक वेळा योग्य नोंद होत नसल्यामुळे. शेतकरी योजनांपासून वंचित राहत होते. यामुळे महसूल व वनविभागाने १५ ऑगस्टपासून पीक पाहणी प्रयोग सुरू केला असून, ॲण्ड्राईड मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी स्वतः स्वतःच्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती देऊन नोंदणी करू शकणार आहेत. यामध्ये मोबाईलवर पिकाचा फोटो काढून ॲप मध्ये टाकल्यावर या जागेचे अक्षांश आणि रेखांश तेथे दिसणार असल्याने पिकांची पारदर्शी नोंद होणार आहे. पीक पाहणी प्रयोगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. ई-पीक पाहणीची अंमलबजावणी महसूल व कृषी विभाग संयुक्तरित्या करणार असून शेतकऱ्यांशी समन्वय साधून समिती तयार करून दर पंधरा दिवसात या विषयावर बैठक घेवुन चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
--------
एका मोबाईलमध्ये होऊ शकेल २० शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद
ज्या शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राईड मोबाईल नाही. त्यांना दुसऱ्या कोणाकडून माहिती भरून घेता येईल. एका मोबाईल धारकाला जास्तीत जास्त २०्र शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद करता येणार आहे. या ॲपमध्ये १५ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीदरम्यान प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती ॲप वर नोंदवणे आवश्यक राहणार आहे.
-------
कोट: ई-पीक पाहणीबाबत स्थानिक महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. याबाबतची परिपूर्ण माहिती गाव पातळीवर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अँप तात्काळ डाऊनलोड करावे व पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पेरा भरावा.
अजित शेलार
तहसीलदार, रिसोड.