आता खंडाळ्याच्या शेतक-यांचाही खरीप हंगामावर बहिष्कार!

By Admin | Updated: March 21, 2016 01:49 IST2016-03-21T01:49:33+5:302016-03-21T01:49:33+5:30

जामदरा येथील शेतक-यांनंतर खंडाळा येथील शेतकरीही आंदोलनाच्या पवित्र्यात.

Now Khandala farmers boycott kharif rumors! | आता खंडाळ्याच्या शेतक-यांचाही खरीप हंगामावर बहिष्कार!

आता खंडाळ्याच्या शेतक-यांचाही खरीप हंगामावर बहिष्कार!

मनोहर राठोड /चौसाळा(जि. वाशिम)
गत तीन वर्षांंपासून दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आता परिस्थितीपुढे हतबल होत असल्याचे दिसून येते. याच हतबलतेतून मानोरा तालुक्यातील खंडाळा येथील शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध कारणांमुळे शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. निसर्गाची साथ मिळत नसल्याने आणि शासन-प्रशासनाचा डोक्यावर हात नसल्याने अडचणीत भर पडत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत गुंतवणूक केलेली रक्कमही वसूल होत नसल्याने, हताश होत शेतकरी खरीप हंगामात पेरणी न करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपत आहेत. १५ दिवसांपूर्वीच मानोरा तालुक्यातील जामदरा गावाने येत्या खरीप हंगामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता मानोरा तालुक्यातीलच खंडाळाच्या पारधी तांडा येथील ७५ टक्के शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या दुष्काळावर राजकीय नेतेमंडळी केवळ राजकारणच करीत आहे. शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. राजकीय नेत्यांकडून शेतकर्‍यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या मानोरा तालुक्यातील खंडाळा पारधी तांडा येथील शेतकर्‍यांनी पेरणी न करता जमीन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. ह्यमाय जेवू घालत नाही अन् बाप भीक मागू देत नाहीह्ण अशा दुहेरी विवंचनेत अडकलेला शेतकरी आजमितीला मरणाच्या दारात उभा आहे. निसर्गाच्या अस्मानी, तर शासनाच्या सुल्तानी संकटाने शेतकर्‍याला हतबल केले आहे. निसर्गाचा लहरीपणा, पाचवीला पुजलेला दुष्काळ, त्यातूनच जन्मलेली नापिकी, उभा झालेला कर्जाचा डोंगर यामुळे जगण्याची उमेद राहिली नसल्याची मानसिकता शेतकर्‍यांची बनत चालली आहे, असे खंडाळा येथील शेतकर्‍यांचे मत आहे.

Web Title: Now Khandala farmers boycott kharif rumors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.