बारावीच्या परीक्षेत नऊ विद्यार्थी निलंबित
By Admin | Updated: March 1, 2016 01:15 IST2016-03-01T01:15:35+5:302016-03-01T01:15:35+5:30
वाशिम जिल्हास्तरीय भरारी पथकाची कारवाई.

बारावीच्या परीक्षेत नऊ विद्यार्थी निलंबित
वाशिम : इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेत शनिवार व सोमवार अशा दोन दिवसात एकूण नऊ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. या विद्यार्थ्यांंना निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. वाशिम जिल्ह्यात नियमित १५ हजार ४९८ आणि पुनर्परीक्षार्थी ६८३ असे एकूण १६ हजार १८१ विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. मराठी पेपरला कॉपी करताना पाच विद्यार्थी निलंबित झाले होते. जिल्ह्यात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय दक्षता पथक कार्यरत असताना केवळ जिल्हास्तरीय पथकाद्वारे कॉपीमुक्त अभियानांतर्गत कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे तालुकास्तरीय पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. २६ फेब्रुवारी रोजी बारावी विज्ञान शाखेच्या गणित विषयाच्या पेपरला जिल्हाधिकार्यांच्या भरारी पथकाने काटा व जऊळका रेल्वे येथील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या. दोन्ही परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी दोन, असे चार विद्यार्थी कॉपी करताना रंगेहात पकडल्याने निलंबित करण्यात आले. २९ फेब्रुवारी रोजी वाकद येथील परीक्षा केंद्रावर पाहणी केली असता, दोन विद्यार्थ्यांना कॉपीप्रकरणी निलंबित करण्यात आले. कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात पथकातील नायब तहसीलदार नीलेश मडके, अव्वल कारकून ज्ञानेश्वर बाजड, लिपिक अमोल देशमुख यांनी केली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिनेश तरोळे यांच्या पथकाने शनिवारी शिरपूर जैन येथील परीक्षा केंद्राला भेट दिली असता, दोन विद्यार्थ्यांंना कॉपीप्रकरणी निलंबित केले. २९ फेब्रुवारी रोजी तराळे यांच्या पथकाने धावंडा येथील एका विद्यार्थ्याला कॉपी करताना रंगेहात पकडल्याने निलंबित केले.