नऊ ग्रामसेवकांना कामात हलगर्जी करणे भोवले
By Admin | Updated: September 4, 2014 23:01 IST2014-09-04T23:01:25+5:302014-09-04T23:01:25+5:30
मालेगाव तालुक्यातील नऊ ग्रामसेवकांवर कारवाई.

नऊ ग्रामसेवकांना कामात हलगर्जी करणे भोवले
मालेगाव : आढावा सभेला सतत गैरहजर राहणे, नियमित करवसुली अहवाल न देणे, कामात हलगर्जीपणा करणे आदी बाबी तालुक्यातील नऊ ग्रामसेवकांना चांगल्याच भोवल्या आहेत. या नऊ ग्रामसेवकांवर मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप पवार यांनी कारवाई करून, कामचुकार ग्रामसेवकांची हयगय करणार नसल्याचे सुतोवाच केले आहे.
मासिक सभेतून मालेगाव पंचायत समितीत ग्रामसेवकांच्या कामकाजाचा आढावा घेताना गटविकास अधिकारी संदीप पवार यांना नऊ ग्रामसेवक कामकाजात चुकारपणा करीत असल्याचे निदर्शनात आले होते. निर्मल भारत अभियानाअंतर्गत माहिती ऑनलाईन न करणे, प्रियासॉफ्टबाबत माहिती अद्यावत न करणे, ग्रामपंचायतीच्या नियमित करवसुलीचा अहवाल न देणे, चौथ्या वित्त आयोगाची माहिती न देणे, शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षलागवड न करणे, घरकुलाची नविन प्रतिक्षा यादी पंचायत समितीला सादर न करणे, लोकशाहीदिनी प्रकरणे निकाली न काढणे, घरकुलाची प्रगती असमाधानकारक असणे आदी कारणांवरुन ई. यु. चिकटे, एस.डब्ल्यू शेळके, ए.एस. साठे, जे.एम.गवई, एस.बि. बोदडे, ए.पी. राजे, के.एस. काळबांडे, बि.एस. भिसडे,ए.पी. गोटे या ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर इतर ग्रामसेवकांनी तातडीने दिरंगाईची प्रकरणे निकाली काढण्याला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये कामात निष्काळजीपणा करणारे ९ जण आढळले. त्यांचेवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या कामात ७ दिवसात प्रगती झाली नाही. तर त्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकार्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी संदिप पवार यांनी सांगीतले.