शेलूबाजार चौकात नव्याने स्वच्छतागृह उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST2021-08-24T04:45:10+5:302021-08-24T04:45:10+5:30

ग्रा.पं. सदस्य आशा अशोक खंडारे यांची मागणी शेलूबाजार : येथील बसस्थानक चौकातील प्रसाधनगृहाला अस्वच्छता व दुर्गंधीने ग्रासले आहे. त्याचा ...

A new toilet should be constructed at Shelubazar Chowk | शेलूबाजार चौकात नव्याने स्वच्छतागृह उभारावे

शेलूबाजार चौकात नव्याने स्वच्छतागृह उभारावे

ग्रा.पं. सदस्य आशा अशोक खंडारे यांची मागणी

शेलूबाजार : येथील बसस्थानक चौकातील प्रसाधनगृहाला अस्वच्छता व दुर्गंधीने ग्रासले आहे. त्याचा कुठलाही उपयोग होत नसल्याने प्रसाधनगृह केवळ शोभेची इमारत बनली असून, या ठिकाणी ग्रामपंचायतने सुसज्ज प्रसाधनगृह उभारून स्वच्छतेच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी अशी मागणी ग्रा.पं. सदस्य आशा अशोक खंडारे यांनी केली आहे.

शासनाकडून ग्रामस्वच्छतेच्या दृष्टीने अनेक योजना आखल्या जातात. गावात किंवा गावालगत असलेल्या परिसरातील रस्त्यावर कोणीही उघड्यावर शौचास जाऊन परिसर अस्वच्छ करू नये यासाठी शासनाकडून प्रत्येक घरी संडास बांधकामासाठी अनुदानही दिले जाते. सोबतच घरी शौचालय नसलेल्या नागरिकांना शासकीय योजनेपासून वंचित केले जाते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाबाबत नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. शेलूबाजार येथील बसस्थानक चौकातील प्रवासी निवाऱ्यालगतचे प्रसाधनगृह निरुपयोगी असून, याठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही. शेलूबाजार ही व्यावसायिक दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. शिवाय याठिकाणी प्रवाशांची वर्दळ असते. त्यादृष्टीने या ठिकाणी सुसज्ज प्रसाधनगृह असणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या व नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असून, या ठिकाणी नव्याने सुसज्ज प्रसाधनगृह उभारून स्वच्छतेच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आशा अशोक खंडारे यांनी केली आहे.

-----------

कोट: शेलूबाजार चौकात महिलांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहातील घाणीमुळे पाय ठेवायलाही जागा नाही. अशा वेळी प्रवासी महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी चौकातील स्वच्छतागृहाची नव्याने उभारणी करून महिला प्रवाशांची समस्या दूर करणे गरजेचे आहे.

-आशा अशोक खंडारे

ग्रा. पं. सदस्य, शेलूबाजार

फोटो

Web Title: A new toilet should be constructed at Shelubazar Chowk