महिलांना सक्षम करणाऱ्या वर्धिनींची उपेक्षा थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:34+5:302021-09-14T04:48:34+5:30
वाशिम : ग्रामीण भागात महिला बचत गटांची निर्मिती आणि त्यांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यांसाठी सज्ज करणाऱ्या राज्यभरातील उमेद अभियानांतर्गत नेमणूक ...

महिलांना सक्षम करणाऱ्या वर्धिनींची उपेक्षा थांबेना
वाशिम : ग्रामीण भागात महिला बचत गटांची निर्मिती आणि त्यांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंद्यांसाठी सज्ज करणाऱ्या राज्यभरातील उमेद अभियानांतर्गत नेमणूक मिळालेल्या वर्धिनींना कोरोना संकटाचा जबर फटका बसला. तुटपुंज्या मानधनावर गावोगावी भटकून सेवा देत असताना राज्यातील सुमारे २९०० वर्धिनींना गेल्या वर्षभरापासून बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील शंभरावर वर्धिनींचा समावेश आहे. आज ना उद्या पुन्हा कामावर घेतले जाईल, या अपेक्षेने या महिला गरज पडेल तेव्हा मोफत सेवा देत आहेत, हे विशेष.
राज्यात ‘उमेद’ अर्थात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात २०११ मध्ये झाली. याअंतर्गत विशेषत: ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून त्यांना उपजीविकेच्या संधी निर्माण करून देण्याचा उद्देश बाळगण्यात आला. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर समुदाय संसाधन व्यक्ती, बॅंक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशू सखी, ग्रामसंघ लिपिका, कृती संगम सखी आदी विभाग निर्माण करून त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन बचत गट निर्माण केले. त्यासाठी लागणारे मार्गदर्शन करण्यासह ग्रामसंघ, प्रभाग संघ व उत्पादक गट तयार करून बचत गटांना कर्ज मिळवून देण्यासह उत्पादित मालास राज्य, केंद्र स्तरावर बाजारपेठ मिळवून दिली. या कंत्राटी मनुष्यबळाच्या जोरावरच राज्यात पाच लाखांपेक्षा अधिक समूह, २० हजारांवर ग्रामसंघ, ८०० च्या आसपास प्रभागसंघ स्थापन होऊ शकले.
असे असताना उमेद अभियानाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० सप्टेंबर २०२० रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतापलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींसह इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलने केली. त्यामुळे संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले; मात्र खेडेगावात बचत गट स्थापनेविषयी प्रभावी जनजागृती करण्यासह महिलांचा बचत गटांमध्ये सहभाग निश्चित करणे, त्यांना बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणाऱ्या वर्धिनींना अद्याप कामे उपलब्ध करून देण्याचा कुठलाच विचार झालेला नाही.
..................
कोट :
कोरोनाच्या संकटामुळे काम पूर्णत: थांबले आहे. यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मानधनही मिळालेले नाही. आता लवकरच ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणे ‘राऊंड’ सुरू होतील, असे वरिष्ठांकडून कळविण्यात आले. असे झाल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे शक्य होईल.
- लक्ष्मी शेळके, वर्धिनी, मालेगाव.