जनतेच्या समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: March 5, 2016 03:25 IST2016-03-05T02:40:57+5:302016-03-05T03:25:00+5:30
राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; दुष्काळाची केली पाहणी.

जनतेच्या समस्यांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष
मेडशी (रिसोड, जि. वाशिम) : सतत तीन वर्षांंपासून असलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाई, चाराटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, शेतकर्यांच्या समस्यांशी शासनाला काहीही घेणे-देणे नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करताना केला.
सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. चार्याअभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अशा बिकट परिस्थितीतदेखील सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. कृषी मंत्र्यांवर हल्ला चढवित ते म्हणाले, की सरकारने गोहत्या बंदी केली ते चांगले झाले; मात्र गोवंश हत्याबंदीमुळे शेतकर्यांना आपली जनावरे विकता येत नाही. जनावरांना, शेतकर्यांना जगविणे सरकारची जबाबदारी असताना सरकार उद्योगपतींना जगवित आहे. हे सरकार उद्योगपती अंबानी, अदानी यांना जगवित आहे. शेतकर्यांचे १३ कोटीचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची ६५ हजार कोटींची कर्जे माफ होतात. मेक इन महाराष्ट्रामध्ये मेडशी आहे का, वाशिम जिल्हा आहे का, असा सवालही त्यांनी केला.
आदिवासी ग्राम कोळदरा व वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांंशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक आमदार अमित झनक यांनी केले. यावेळी मेडशी व परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकर्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार किसनराव गवळी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष कोरपे, वामनराव देशमुख आदींची उपस्थिती होती.