राष्ट्रवादी कॉग्रेसने बांधले आघाडीच्या हातावर ‘घड्याळ’
By Admin | Updated: July 13, 2014 22:31 IST2014-07-13T22:31:03+5:302014-07-13T22:31:03+5:30
नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसची युती अभेद्य राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसने बांधले आघाडीच्या हातावर ‘घड्याळ’
वाशिम : आगामी १४ जुलै रोजी होवू घालतलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसची युती अभेद्य राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन नामांकन दाखल केलेल्या विद्यमान उपाध्यक्षा सायराबी सलीम बेनिवाले यांनी १३ जुलैला नामांकन मागे घेतल्यामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. बेनिवाले यांनी माघार घैतल्यामुळे शिवसेनेच्या कृष्णाताई गोरे व जिल्हा विकास आघाडीच्या लताताई उलेमाले यांच्यात लढत होत आहे. स्थानिक नगराध्यक्षपदासाठी १४ जुलैला निवडणूक होवू घातली आहे. विद्यमान नगराध्यक्षा रेखाताई शर्मा यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नविन नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी नगराध्यक्षपद ओबिसी महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडीच्या लताताई उलेमाले, शिवसेनेच्या कृष्णाताई गोरे व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सायराबी बेनिवाले यांनी नामांकन दाखल केले होते. २७ सदस्य संख्या असलेल्या नगर पालिकेत जिल्हा विकास आघाडीचे १२, शिवसेनेचे ९, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाच तर कॉग्रेसचे एक नगरसेवक आहेत. गत वेळी जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसने एकत्र येऊन सत्तास्थापण केली होती. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षपद आघाडीकडे असल्यामुळे यावेळी राष्ट्रवादीच्या वाट्यावर सदर पद यावे असा आग्रह स्थानिक पदाधिकार्यांनी धरला होता. त्याच पृष्ठभूमिवर सायराबी बेनिवाले यांनी नामांकनही दाखल केले होते. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षैप करून पालिकेतील सत्तारूढ युती अभेद्य ठेवण्यात यश मिळविले आहे. नामांकन परत घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सायराबी बेनिवाले यांनी आपले नामांकन परत घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोरे व जिल्हा विकास आघाडीच्या उलेमाले यांच्यात ही लढत होणार आहे.शिवसेनेनेही यावेळी या निवडणूकीत रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.
** उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्याला
जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या युतीत नगराध्यक्षपद जिल्हा विकास आघाडीकडे गेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर जाणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये या पदासाठी बरेच इच्छूक आहेत. विद्यमान उपाध्यक्षा सायराबी बेनिवाले यांचे पती सलीम बेनिवाले, पालिकेतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेता मो. जावेद पहेलवान, शोभाताई अंभोरे, विद्यादेवी लाहोटी आदींची नावे या पदासाठी चर्चेत असली तरी पक्ष काय निर्णय घेतो त्यावरच सर्व अवलंबून राहणार आहे.