नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
By Admin | Updated: January 15, 2016 02:11 IST2016-01-15T02:11:52+5:302016-01-15T02:11:52+5:30
मानोरा, मालेगाव नगर पंचायत निवडणूक.

नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
वाशिम: मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीच्या धक्कादायक निकालाने दिग्गजांना जमिनीवर आणले असून, आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. दरम्यान, मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तर मानोर्यात भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे; मात्र ऐनवेळी काही चमत्कार झाला तर धक्कादायक निकालही समोर येऊ शकतो. मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीने बर्याच राजकीय उलथापालथी घडविल्या. १0 जानेवारीला मतदान झाल्यानंतर दिग्गजांनी बांधलेले अंदाज ११ जानेवारीच्या मतदानानंतर फोल ठरले. मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मुसंडी मारत तत्कालीन ग्रामपंचायतच्या सत्ताधार्यांचा दारुण पराभव केला. शिवसंग्रामने पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उडी घेऊन चार जागा काबीज केल्या. येथे भाजपाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रत्येकी चार अशा आठ जागा पटकावून नगर पंचायतमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळविला. शिवसंग्राम चार, शिवसेना तीन व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला केवळ एका जागेची गरज आहे. एका अपक्ष सदस्याला आपल्या तंबूत आणण्यासाठी काँग्रेस-राकाँच्या नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. अपक्ष सदस्य या आघाडीला मिळाला तर नगर पंचायतवर पहिली सत्ता स्थापन करण्याचा मान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मिळू शकतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा अपवाद वगळता अन्य पक्षांची युती होणे अवघड आहे. शिवसंग्राम चार, शिवसेना तीन, भाजपा व अपक्ष प्रत्येकी एक असे नऊ सदस्य एका ठिकाणी बसविण्याची ह्यसर्कसह्ण अवघड असल्याने कुणी पुढाकार घेण्याची शक्यता कमीच आहे. अपक्ष सदस्य गळाला लावून नगर पंचायतवर सत्ता आणण्यासाठी काँग्रेस-राकाँ आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. मालेगावचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार काँग्रेसकडे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मीनाक्षी परमेश्वर सावंत हे एकमेव एससी प्रवर्गातील उमेदवार आहेत. काँग्रेस-राकाँची युती असल्याने नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे गेल्यास उपाध्यक्ष पद काँग्रेस की अपक्षाकडे, हा प्रश्न सध्या अनुत्तरीय आहे.