‘नाफेड’च्या तूर खरेदीला ‘ब्रेक’!
By Admin | Updated: February 24, 2017 02:04 IST2017-02-24T02:04:47+5:302017-02-24T02:04:47+5:30
वाशिम जिल्ह्यातील स्थिती; माल साठविण्याकरिता गोदामेच नसल्याने पाचपैकी तीन केंद्र पडले बंद.

‘नाफेड’च्या तूर खरेदीला ‘ब्रेक’!
वाशिम, दि. २३- खरेदी केलेली तूर साठविण्याकरिता गोदामेच नसल्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या 'नाफेड'च्या तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. पाचपैकी तीन केंद्र बंद करण्यात आले असून, येत्या चार दिवसांत उर्वरित दोन केंद्रही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील तीन ठिकाणी 'नाफेड'ची खरेदी बंद झाल्यानंतर शेतकर्यांची पुन्हा पिळवणूक होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा खूपच कमी दराने तूर खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. गतवषीर्पेक्षा १९ हजार हेक्टरने तुरीचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात थोडी वाढ झाली असल्याने बाजारात या शेतमालाची मोठी आवक होत आहे. दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटलच्या दरापेक्षा कमी दरात व्यापार्यांकडून तुरीची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. अशात जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रीय सहकारी कृषी पणन महामंडळाकडून (नाफेड) तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. त्यामुळे नाफेडकडे शेतकर्यांचा कल वाढला. जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंतच नाफेडकडून ७६ हजार क्विंटलहून अधिक तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये नाफेडसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाने (एमएससीएफ) वाशिम, अनसिंग, मालेगाव आणि कारंजात मिळून ५८ हजार ९00 क्विंटल तूर खरेदी केली, तर विदर्भ पणन महामंडळाने (व्हीसीएमएफ) मंगरुळपीर येथे १८ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. नाफेडने खरेदी केलेली तूर ही राज्य आणि केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामांत साठविण्यात येत होती; परंतु वखार महामंडळाची गोदामे भरल्याने आता नाफेडसमोर खरेदी केलेल्या तुरीच्या साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगरुळपीर, मालेगाव आणि अनसिंग या ठिकाणची सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आली, तर वाशिम आणि कारंजा येथील गोदामेही भरत आली असल्याने या ठिकाणची खरेदी येत्या दोन दिवसांतच बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली.