अतिक्रमणावर चालला पालिकेचा बुलडोजर
By Admin | Updated: November 19, 2014 02:27 IST2014-11-19T02:27:42+5:302014-11-19T02:27:42+5:30
वाशिम शहरातील काहीभागात अतिक्रमण निमुर्लन मोहीम, अवैध बांधकाम जमीनदोस्त.

अतिक्रमणावर चालला पालिकेचा बुलडोजर
वाशिम : येथील संतोषी माता नगरमध्ये नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरूंद झाला होता. रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. यामध्ये बहुतांश श्रीमंतांच्याच घरावर जेसीबी चालविण्यात आला. यामध्ये अंदाजे ६0 ते ७0 लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शहराच्या विकास आराखड्यामध्ये संतोषी माता नगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, अभियंता विनय देशमुख यांच्यासह न.प. च्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी रस्त्याचे मोजमाप केले. यामध्ये तेथील बहुतांश रहिवाशांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरासरी १0 फूट अतिक्रमण केल्याचे आढळून आले. नगर विकास आराखड्यानुसार रस्ता हा नाली बांधकाम वगळता ३0 फूट रूंदीचा होणे अपेक्षित आहे; मात्र नगर परिषदेने २५ फूट रस्ता मोकळा करण्यासाठी रहिवाशांना विनंती केली. रहिवाशांनी स्वत:हून नगर परिषदेला अतिक्रमण काढण्यास सहमती दिली. या अतिक्रमणामध्ये रामा जाजू, रामकृष्ण कालापाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, शैलेश जैन, बबन देवकर, अभिलाष जैन, विवेक साहू यांच्यासह अनेक रहिवाशांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असताना तेथील रहिवाशांनी नगर परिषदेला विकास कामासाठी पूर्ण सहकार्य केल्यामुळे मुख्याधिकारी वसंत इंगोले व अभियंता विनय देशमुख यांनी रहिवाशांचे कौतुक केले. शहरामधील सर्व नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका ठेवल्यास शहराचे सौंदर्यीकरण करण्यास जास्त कालावधी लागणार नाही. अशा प्रतिक्रियाही घटनास्थळी उमटल्या.