मानोरा येथे मुद्रा योजनेचा गजर
By Admin | Updated: March 27, 2017 15:31 IST2017-03-27T15:31:15+5:302017-03-27T15:31:15+5:30
मानोरा येथे सोमवारी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा उत्साहात पार पडला.

मानोरा येथे मुद्रा योजनेचा गजर
मानोरा : जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व मानोरा तहसील कार्यालयाच्यावतीने मानोरा येथे सोमवारी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा उत्साहात पार पडला.
मेळाव्याला ह्यनाबार्डह्णचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, नायब तहसीलदार एस. बी. तायडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नागराळे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहाय्यक प्रबंधक काटोले, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक विलास चेटोले, मानोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. जे. वाघमारे, कारंजा पंचायत समितीच्या गट समन्वयक वर्षा ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. यावेळी खंडरे म्हणाले की, शेतीचा खर्च वाढत चालल्याने आज शेती तोट्यात आली आहे. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग, व्यवसाय सुरु करणे आवश्यक बनले आहे. हे उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना एक नवी संधी आहे. लहान-मोठ्या उद्योग, व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या या योजनेतून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संधीचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी आपला छोटासा उद्योग, व्यवसाय उभारावा. तसेच यामाध्यमातून इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन खंडरे यांनी केले.
स्टेट बँक आॅफ इंडियाचे सह प्रबंधक काटोले यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रतेचे निकष याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी मुद्रा योजनेची सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नागराळे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रकाश खाटिक यांनी केले.