महावितरणच्या 'एबी केबल'ची कामे अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:25+5:302021-02-14T04:38:25+5:30
ग्रामीण भागांत थेट वीज वाहिनीवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरली जाते. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणने ‘एरियल बंच’ ...

महावितरणच्या 'एबी केबल'ची कामे अर्धवट
ग्रामीण भागांत थेट वीज वाहिनीवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरली जाते. या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणने ‘एरियल बंच’ केबल टाकून वीज ग्राहकांना नव्याने वीज जोडणी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचे कंत्राट काही कंपन्यांना देण्यात आले. मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार परिसरातील पिंप्री अवगणसह इतरही गावांत याची कामे गतवर्षी सुरू करण्यात आली; परंतु अद्यापही ती पूर्ण झाली नसून, वीज खांबावर ओढून ठेवलेले ‘एरियल बंच’ केबल व वीज जोडणीसाठी लावलेले बॉक्स धूळखात पडले आहेत. पिंप्री अवगण येथील प्रत्येक वीज खांबावर ‘एरियल बंच’ केबलचे जाळे दिसत आहे; परंतु त्यातून एकाही वीज ग्राहकाला वीज जोडणी देण्यात आली नाही. महावितरणकडून याबाबत पाठपुरावाही करण्यात आला नाही किंवा अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला सूचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला असून, महावितरणच्या या प्रकाराबाबत वीज ग्राहकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
---------
वीज चोरीचे प्रकार कायमच
महावितरणने ग्रामीण भागात आकडे टाकून केली जाणारी वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून ‘एरियल बंच’ केबलचा आधार घेतला जात आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही महावितरणकडून केला जात आहे; परंतु अनेक भागांत ही कामेच अपूर्ण असल्याने वीज चोरीचा प्रकार कायमच असून, एरियल बंच केबलसाठी केलेला खर्चही वायफळ झाल्याचे स्पष्ट होत आहे.