रोहयो महाघोटाळा : ८६ ग्रामपंचायतींमधील कामांची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 14:43 IST2019-12-01T14:42:58+5:302019-12-01T14:43:03+5:30
३ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रियेस सुरूवात होणार आहे.

रोहयो महाघोटाळा : ८६ ग्रामपंचायतींमधील कामांची होणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १० पथक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, ३ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रियेस सुरूवात होणार आहे.
मालेगाव तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या बहुतांश कामांचा दर्जा निकृष्ट असून अनेक कामे कागदोपत्रीच उरकण्यात आली आहेत. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या पथकाने वाघळूद, ब्राम्हणवाडा यासह इतर काही गावांमधील कामांची चौकशी केली असता, त्यात अनयिमितता व गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मालेगाव तालुक्यात इतरही अनेक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळा झाला असून विशेष तपासणी व सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावरून मालेगाव तालुक्यातील सर्व ८६ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या रोहयोच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पारित केले. त्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारी कारवाईच्या ‘रडार’वर
मालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता झालेली आहे. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन आता चौकशी होणार असून भ्रष्टाचारी कारवाईच्या ‘रडार’वर येणार आहेत.