खासदार, आमदारांचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:04+5:302021-02-05T09:25:04+5:30
वाशिम : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी भांडण करत संपवून टाकण्याची धमकी दिली, अशी तक्रार भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी ...

खासदार, आमदारांचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
वाशिम : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी भांडण करत संपवून टाकण्याची धमकी दिली, अशी तक्रार भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी दाखल केली; तर खासदार भावना गवळी यांनीही आमदार पाटणी यांनी दमदाटी करून तथा अर्वाच्च भाषेत बोलून अपमान केला, अशी तक्रार दाखल केली आहे. दोन जबाबदार लोकप्रतिनिधींचा हा वाद वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोहोचला असून, वाशिम व नजिकच्या यवतमाळ जिल्ह्यात यासंबंधीची खमंग चर्चा रंगत आहे.
आमदार पाटणी यांच्या तक्रारीनुसार, प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्य प्रवेशव्दारातून आत गेल्यानंतर त्याठिकाणी आधीच आमदार गोपीकिशन बाजोरिया व ५० ते ६० कार्यकर्त्यांसह उपस्थित असलेल्या खासदार भावना गवळी यांनी आवाज देऊन त्यांना थांबवले. यावेळी खासदार गवळी यांनी भांडण सुरू करून दमदाटी केली. ‘माझ्याशी खेटे घेऊ नका, तुम्हाला पाहून घेईन, संपवून टाकीन’, अशी धमकी दिली. यावेळी गवळी यांच्या कार्यकर्त्यांपैकी काही लोकांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या अंगरक्षकाने त्यांना अडवले. त्यामुळे खासदार भावना गवळी व त्यांचे साथीदार भविष्यात काय करतील, याचा नेम नाही. यामुळे शांतता भंग होऊ शकते. अशा परिस्थितीत गुन्हा नोंदविण्यात यावा व कारवाई करावी, असे आमदार पाटणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, भावना गवळी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या बाहेर काही शेतकरी व नागरिक गुंठेवारी व अन्य समस्यांचा निपटारा होण्याकरिता पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी जमले होते. गुंठेवारी नियमित करून भूखंडाची खरेदी सुरू करण्याची संबंधितांची मागणी होती. मी त्यांच्याशी बोलत असताना त्याठिकाणी आमदार राजेंद्र पाटणी व ७० ते ८० लोक सभागृहाबाहेर आले. गुंठेवारीच्या विषयात तुम्ही पडू नका, असे म्हणत पाटणी मला म्हणाले की, ‘तू जरी पाच टर्मची खासदार असलीस तरी तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी गुंठेवारीची नियमित व खरेदी होऊ देणार नाही.’ यावेळी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी पाटणी यांना समजावण्याचा प्रयत्न केला; ‘पण तुम्ही दोघेही माझे काहीच बिघडवू शकत नाही’, असे म्हणत पाटणी यांनी आपल्याला दमदाटी केली. ‘तू आणि बाजोरिया वाशिम जिल्ह्यात कसे फिरता ते पाहून घेतो. माझ्या लोकांना सांगून वाशिम जिल्हा व शहर बंद करायला लावतो व तुमच्याविरूद्ध तक्रार देऊन तुम्ही आणलेले विकासकाम होऊ देत नाही’, अशा अर्वाच्च भाषेत बोलून पाटणी यांनी महिला खासदाराचा अवमान केला. राजेंद्र पाटणी हे आपल्या माणसांमार्फत माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर हल्ला करायला लावू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध त्वरित गुन्हा दाखल करावा, असे खासदार गवळी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
..................................
बॉक्स
भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी खासदार, आमदारांमध्ये घडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाशिम शहरात फिरून खासदार भावना गवळी यांच्या निषेधार्थ व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या समर्थनार्थ वाशिम शहर बंदचे आवाहन केले. यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांमध्ये यामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी विनाविलंब पुरेसा बंदोबस्त तैनात केला. २७ जानेवारीला मात्र कुठेही बंद असल्याचे दिसून आले नाही.