शेतक-यांचे दिवाळीच्या दिवशी आंदोलन
By Admin | Updated: October 25, 2014 00:17 IST2014-10-25T00:17:12+5:302014-10-25T00:17:12+5:30
‘चटणी-भाकर’ खावून अभिनव आंदोलनाने वेधले लक्ष, वाशिम जिल्हाधिका-यांना दिले निवेदन.

शेतक-यांचे दिवाळीच्या दिवशी आंदोलन
वाशिम :गोवर्धन येथील गजानन भिकाराव वाघांसह इतर शेतकर्यांनी विविध मागण्यांसाठी दीपावलीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खावून आंदोलन केले.
या आंदोलनामागे केवळ वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांवर आजघडीला ओढावलेल्या विविध संकटांसह जगणे मुश्कील झालेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाला जागे करण्याचीच भूमिका होती. या आंदोलनादम्यान वाशिम जिल्ह्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, शेतकर्यांकडील थकीत कर्ज तत्काळ माफ करुन त्याना नव्याने बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, चालू खरीप हंगामात सर्व शेतकर्यांना सरसकट पीक विमा योजनेचा लाभ द्यावा, शेतकर्यांना कृषी पंपासाठी किमान दहा तास अखंडित वीज पुरवठा द्यावा, शेतकर्यांना शेतीकर्ज काढणीसाठी लागणारा कर्ज नसल्याचा दाखला विनामूल्य देण्यात यावा, आदी प्रमुख मागण्या शेतकर्यांनी केल्या. या आंदोलनात गजानन वाघ यांच्यासह प्रल्हाद कानडे, मनोहर भवर, सुभाष ढोकणे, अकाश वाघ, संतोष नवले, मोतीराम वर्हाडे, विश्वनाथ ढोकणे, हिम्मतराव वाघ, पांडुरंग वाघ, प्रल्हाद अंभोरे, निलेश ढोकणे, विक्रमा जाधव, महादेव ठाकरे, दिनकर वाघ, पंकज वाघ, संदेश वाघ, गजानन कु. वाघ आदी सहभागी झाले होते. गतवर्षी अतवृष्टी व गारपिटीने शेतकर्यांची उभी पिके नेस्तनाबूत केली. खरीप व रब्बी हंगामानंतर निदान यावेळच्या खरीप हंगामात तरी निसर्गाची कृपा होईल, असे वाटत होते; परंतु यावर्षीचा खरीप हंगाम व नगदी असलेले सोयाबीनचे पीक अल्प पावसामुळे पूर्णत: संपले. त्यामुळे आधीच गतवर्षीच्या संकटाने कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या खाईत ढकलला गेला आहे. या आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या ३ नोव्हेंबरपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवशी किमान १00 शेतकरी अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात करतील, असा इशारा सुभाष देव्हढे यांनी दिला आहे.