बेशरमची फुले वाहून क्रीडा अधिका-याविरोधात आंदोलन
By Admin | Updated: April 21, 2017 13:38 IST2017-04-21T13:38:30+5:302017-04-21T13:38:30+5:30
स्वाभिमानी शेतकरीसंघटना व भाजपा पदाधिकारी यांनी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यागेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले.

बेशरमची फुले वाहून क्रीडा अधिका-याविरोधात आंदोलन
मेहकर : मेहकर येथील प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी हे कधीच कार्यालयात
उपस्थित राहत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांचे मानधन काढण्यासाठी पैशाची मागणी
करतात व केवळ कागदोपत्री दौरे दाखवून शासनाची फसवणूक करतात. त्यामुळे अशा
भ्रष्ट व कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या तालुका क्रीडा अधिकाऱ्याची चौकशी
करुन तात्काळ निलंबीत करावे, यासाठी मानद कर्मचारी, स्वाभिमानी शेतकरी
संघटना व भाजपा पदाधिकारी यांनी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
गेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले.
मेहकरचे प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी सी.जी.उप्पलवार हे आपल्या
कार्यालयात कधीच उपस्थित राहत नाहीत. मनमानी कारभार करुन कर्मचाऱ्यांवर
धाकदपट करुन दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच कागदोपत्री दौरे दाखवून
ठरलेल्या दौऱ्याच्या ठिकाणावर कधीच सापडत नाहीत. तर कर्मचाऱ्यांचे मानधन
काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाहीतर तुला
कामावरुन काढून टाकीन, तुझे मानधन देणार नाही, वरिष्ठांकडे तुझा चुकीचा
अहवाल पाठवून तुझे रेकॉर्ड खराब करीन, अशा धमक्या कर्मचाऱ्यांना देतात.
त्यामुळे तालुका क्रीडा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली
असून, कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. प्रभारी तालुका
क्रीडा अधिकारी हे मेहकर, लोणार, सिंदखेडराजा कार्यालयाचे रेकॉर्ड हे
आपल्या गाडीत नेऊन कामकाज करतात. कार्यालयात हजर राहत नाहीत, मात्र आम्ही
कार्यालयात हजर असून, वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठवून वरिष्ठांची दिशाभूल
करतात. त्यामुळे अशा भ्रष्ट व शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची
तात्काळ चौकशी करुन निलंबीत करावे, यासाठी ज्ञानेश्वर टाले, सुभाष शेळके,
किरण पाटील, बाळू देवकर, संतोष मानवतकर, जितू अडेलकर, पवन गाभणे, संतोष
टाले, सैय्यद इस्माईल, संदीप गाडेकर, गणेश देवकर सह मानद कर्मचारी,
स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपाचे पदाधिकारी यांनी तालुका क्रीडा
कार्यालयाच्या गेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले. (तालुका प्रतिनिधी)