मोटारसायकल चोरटे जेरबंद
By Admin | Updated: March 2, 2016 02:41 IST2016-03-02T02:41:57+5:302016-03-02T02:41:57+5:30
रिसोड पोलिसांची कारवाई.

मोटारसायकल चोरटे जेरबंद
रिसोड(जि. वाशिम ): गत काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या मोटारसायकलचोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मंगळवारी रिसोड पोलिसांना यश आले. रिसोड शहर, तालुका व जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. या चोर्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांची विविध पथके गठित करण्यात आली आहेत. रिसोड पोलिसांना मोटारसायकल चोरट्यांबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सापळा रचण्यात आला. २८ फेब्रुवारी रोजी या टोळीचा सूत्रधार भिका सखाराम मुळे हा शहरात चोरीची मोटारसायकल विक्री व लगेच दुसरी मोटारसायकल चोरण्याच्या बेताने दाखल झाला होता. याच दिवशी दुपारच्या सुमारास रिसोड पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा मुळे हा पोलिसी खाक्या दाखविताच पोपटासारखा बोलता झाला. त्याच्याकडून एकूण १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदर मोटारसायकली वाशिम, मंगरुळपीर, लोणार अशा विविध ठिकाणच्या असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी भिका सखाराम मुळे (रा. लावना ता. मेहकर), अशोक अंकुश चव्हाण व ऋषीकेश खरबळकर (वेणी ता.लोणार) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर आरोपींची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी भांदविचे कलम ३७९, ४११, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस उपनिरीक्षक रवि हुंडेकर, गजानन पांचाळ, गणेश कोकाटे, भागवत काष्टे, विनोद धनवट, शेख अन्सार यांनी कामगिरी बजावली.