आईने दिला मुलाला पुनर्जन्म!
By Admin | Updated: September 2, 2014 23:29 IST2014-09-02T23:19:42+5:302014-09-02T23:29:46+5:30
साखरखेर्डा परिसरातील एका आईने मुलाला वाचविण्यासाठी स्वत:ची किडनी दिली आहे.
आईने दिला मुलाला पुनर्जन्म!
अशोक इंगळे/सिंदखेडराजा
पोटचा गोळा संकटात सापडला की, कोणतीही आई कोणताही निर्णय घेताना मागे पुढे पाहत नाही. साखरखेर्डा परिसरातील एका आईने मुलाला वाचविण्यासाठी स्वत:ची किडनी देऊन, याची प्रचिती दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील मूळ रहिवासी, माजी सैनिक बद्रीनाथ यशवंतराव गाडगे हे सैन्य दलातून सेवानवृत्त झाल्यापासून मेहकर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा पहिला मुलगा दिपक हा जन्मत: व्यंग, तर दुसरा मुलगा रविंद्र याला वयाच्या २५ व्या वर्षीपासून किडनीच्या आजाराने ग्रासले. एप्रिल महिन्यापासून तो ह्यडायलासिसह्णवर होता. रविंद्र इंजिनिअर असून, त्याला याच महिन्यात कंपनीकडून र्जमनीच्या दौर्यावर जाण्याची संधी मिळाली होती; मात्र त्याचवेळी त्याचा किडनीचा त्रास वाढला. प्रारंभी त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले. गत वर्षभरात रविंद्रच्या आजारावर दहा लाख रुपये खर्च करण्यात आले; मात्र आजारपण वाढतच गेले. दरम्यान, रविंद्रची पुन्हा तपासणी केली असता, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मुलाच्या भविष्यासाठी त्याची आई सुमन गाडगे (४९) यांनी स्वत:ची किडनी त्याला दिली. औरंगाबाद येथे एका रुग्णालयात रविंद्रवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची आई खंडाळा येथील जि.प.शाळेवर शिक्षिका असून, त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथे उपचार सुरु आहे.