‘सुजलाम,सुफलाम’च्या कामांसाठी महिनाभराची मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 02:20 PM2019-11-29T14:20:28+5:302019-11-29T14:20:37+5:30

एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत.

A month-long deadline for the work of 'Sujalam, Sufalam'! | ‘सुजलाम,सुफलाम’च्या कामांसाठी महिनाभराची मुदत!

‘सुजलाम,सुफलाम’च्या कामांसाठी महिनाभराची मुदत!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून ‘सुजलाम, सुफलाम’ अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रशासनाने जलसंधारणाची विविध कामे केली. त्यापैकी एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. आता ही कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तथापि, या कामांसाठी ३१ डिसेंबरपर्यंतचीच मुदत असून, सद्यस्थितीत सर्वच जलस्त्रोतात पाणी असल्याने ही कामे करण्याचे आव्हानच प्रशासनासमोर उभे झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात १४ नोव्हेंबर २०१८ पासून सुजलाम, सुफलाम अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरात साठवण तळे, ढाळीचे बांध, दगडी नाला बांध, नाला खोलीकरण, समतल चर आदि मिळून ४०३८ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी बीजेएसच्यावतीने प्रशासनाच्या मागणीनुसार ३५ जेसीबी आणि १७ पोकलन मशीनही उपलब्ध करण्यात आल्या; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रस्तावित ४९ शेततळ्यांपैकी केवळ एक शेततळे पूर्ण करण्यात आले, तर इतर शेततळ्यांपैकी ४ शेततळे वगळता वाढत्या खर्चासह इतर अडचणींमुळे काही रद्द करावी लागली. त्यानंतर या अभियानातील सर्व मिळून जलसंधारणाची ७३५ कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले. तथापि, जुलै महिन्यानंतर पावसाळ्यामुळे ही कामे सुरुच होऊ शकली नाहीत, तर आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात ५८४ ढाळीचे बांध, १०७ नाला खोलीकरण आणि ४ साठवण शेततळ्यांसह इतर काही कामांचा समावेश आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नाले, नद्यांसह इतर जलस्त्रोता मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ही कामे करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाला प्रतिक्षा करावी लागणार असून, आता महिनाभरात कामे होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२९७ कामांतून ५६८ कोटीर लीटर जलसाठा
जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत गतवर्षी अनेक कामे विविध तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिली असली तरी, याच अभियानातून जलसंधारणाची विविध प्रकारची २९७ कामेही पूर्ण करण्यात आली असून, या कामांमुळे आता जिल्ह्यात ५६८ कोटी लीटरचा अतिरिक्त जलसाठाही निर्माण झाला आहे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील भुजल पातळीसाठी होणार आहेच शिवाय शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे.

सुजलाम, सुफलाममधील प्रलंबित कामांपैकी काही कामे तांत्रिक अडचणींमुळे रद्द करावी लागली, तर काही कामे जलयुक्त शिवार अभियानातून केली जाणार आहेत. यातील अडचणींचा विचार न करता कामे कशी करता, येतील त्याचे नियोजन करण्यावरच भर दिला जात आहे.
-एस. एम. तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: A month-long deadline for the work of 'Sujalam, Sufalam'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम