२१ वर्षीय तरुणी व तिचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अक्षय माणिक आडे याच्यासोबत पीडित युवतीचे प्रेमसंबध होते. नोंदणी विवाह करण्याचेदेखील ठरले होते. यासंदर्भात वाशिम येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रस्ताव सादर केला असता, त्याला ९० दिवसांचा कालावधी लागणार होता. ही बाब अक्षयच्या वडिलांना माहीत झाली म्हणून त्याचे वडील माणिक सीताराम आडे यांनी पीडितेच्या वडिलांवर दबाव टाकून पीडितेकडून आपसी समझोता लिहून घेतला. दरम्यान, २४ सप्टेंबरला अक्षय हा पीडितेच्या घरात येऊन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असता, पीडितेने आरडाओरड केली. यामुळे अक्षय आडे याने तेथून पळ काढला. पीडितेचे काका व वडील अक्षय आडेच्या घरी ही बाब सांगण्याकरिता गेले असता आरोपी अक्षय माणिक आडे, नीलेश माणिक आडे, भाऊराव रतिराम आडे, माणिक रतिराम आडे यांनी शिवीगाळ केली तसेच अक्षय याने छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची तसेच तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. यावरून मानोरा पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध कलम ३५४ अ, ४५२, २९४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हे दाखल केले. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विजय जाधव करत आहेत.
युवतीची छेडछाड; चार जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:46 IST