लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/रिसोड : देशातील शेतकऱ्यांनी न्यायोचित हक्कासाठी लढा उभारला; मात्र मोदी सरकार आधारभूत किमतीबाबत अद्याप मौन बाळगून आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हीन वागणूक दिली जात आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ६ फेब्रुवारी रोजी रिसोड येथे आयोजित सभेत केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवरून केंद्र सरकारवर शरसंधान साधले.रिसोड येथील पुष्पाताई पाटील खडसे महाविद्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील सहभागी झाले होते. यावेळी आ. राजेंद्र शिंगणे, अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती महिला अध्यक्ष सुक्षना सलगर, प्रवीण कुठे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रदेश सरचिटणीस बाबाराव पाटील खडसे, दिलीपराव जाधव, रिसोड तालुका अध्यक्ष तेजराव पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. जयंत पाटील यांनी इतिहासाची पुनरावृत्ती मोदी सरकारद्वारे होत असल्याचे सांगून हे सरकार देशातील कष्टकऱ्यांचा बळी घेत आहे. दिल्ली येथील आंदोलनकारी शेतकऱ्यांना पाणी, वीज दिले जात नाही व हीच क्रूर नीती केंद्र शासनाची आहे, हे एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव पाटील खडसे यांनी केले. या कार्यक्रमात कुठलाही सत्कार सोहळा घेण्यात आला नाही, हे विशेष. यावेळी पदाधिकारी , कार्यकर्ते माेठया संख्याेन उपस्थित हाेते.(प्रतिनिधी)
मोदी सरकार देशातील कष्टकऱ्यांचा बळी घेत आहे - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:58 IST