परवाना मिळण्यापूर्वीच गौण खनिजाचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:39 PM2019-08-31T13:39:12+5:302019-08-31T13:39:17+5:30

३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Minor mineral excavation before being licensed | परवाना मिळण्यापूर्वीच गौण खनिजाचे उत्खनन

परवाना मिळण्यापूर्वीच गौण खनिजाचे उत्खनन

googlenewsNext

- संतोष वानखडे/बबन देशमुख 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम/मानोरा : जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रशर मशीन, जनरेटर, टिप्पर, पोकलेन, गिट्टी व इतर साहित्याचा ताफा तेथे असतानाही या गंभीर प्रकाराकडे तहसिल, जिल्हा खनिकर्म किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष जाऊ नये, याबाबत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.
गौण खनिज उत्खनन किंवा खनिपट्टा मिळण्यासाठी शेतजमीन अकृषक परवाना, ग्राम पंचायतचा ठराव, ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र, पर्यावरण विभागाची परवानगी यासह जवळपास २९ अटींची पुर्तता करावी लागते. या अटींची पुर्तता केल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाकडून परवाना दिला जातो. मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) या उजाड गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असल्याने हट्टी ता. मानोरा येथील पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी मानोरा तहसिलदार तसेच जिल्हा खनिकर्म विभागाकडे यासंदर्भात माहिती मागविली. सुरूवातीला टोलवाटोलवी करून राठोड यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर राठोड यांनी जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडे, टेरका (ऊ) येथील गट क्रमांक १७/१ आणि १७/२ मधील खनिपट्टा आदेशाची प्रत, पर्यावरण व अन्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यासह अन्य महत्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर केला. जिल्हा खनिकर्म विभागाने माहिती अधिकारांतर्गत दिलेली माहिती थक्क करणारी आहे. सदर भूमापन क्रमांकाच्या अनुषंगाने अभिलेख पाहणी केली असता, सदर गट क्रमांक १७/१ व १७/२ चा खनिपटा मिळण्याबाबतचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झाला असून सदर प्रकरणात अद्यापपर्यंत आदेश पारीत झालेला नाही तसेच या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना देण्यात आलेला नाही, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.
कोणताही परवाना मिळालेला नसताना, तेथे ३०० पेक्षा अधिक क्षमतेची टीपीएच क्रेशर मशीन बसविली, दगड उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंग मशीन व पाच ते सहा मोठ्या पोकलेन, दोन मोठे जनरेटर, अंदाजे २५ ते ३० मोठे टिप्पर असून, ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन केल्याची तक्रार पृथ्वीराज राठोड यांनी तहसिल कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली. परंतू, अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय नेमकी काय भूमिका घेते, याकडे तक्रारकर्त्यासह सर्वांचे लक्ष लागून आहे.

टेरका येथील खनिपट्टा परवाना आणि गौण खनिज उत्खनन यासंदर्भात माहिती घेतली जाईल. गौण खनिज उत्खननसाठी एका कंपनीने रॉयल्टीचा भरणा केला आहे. रॉयल्टीचा भरणा केल्यानंतरही गौण खनिज उत्खनन करण्यासाठी परवाना आवश्यक असतो. परवाना नसेल तर निश्चितच कारवाई केली जाईल. सविस्तर चौकशी केली जाईल.
- ऋषिकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

टेरका (ऊ) येथील खनिपट्टासंदर्भात अर्ज प्राप्त झालेला आहे. परंतू, अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश पारीत झाला नाही किंवा परवाना देण्यात आलेला नाही. अवैध उत्खनन होत असल्यासंदर्भात कुणाची तक्रार असेल तर कारवाई केली जाईल. तसेच वाशिम येथील चमू पाठवून तातडीने घटनास्थळाची पाहणी करून नियमानुसार कारवाई करू.
- डॉ. विनय राठोड
जिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम

टेरका येथील खनिपट्टासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संबंधितांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे २० लाख रुपयांची रॉयल्टी भरली आहे. आणखी काही रॉयल्टी भरून घेणार आहो.
- डॉ. सुनील चव्हाण,
तहसिलदार, मानोरा

Web Title: Minor mineral excavation before being licensed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.