वैद्यकीय देयकांआड लाखोंची उलाढाल!
By Admin | Updated: February 27, 2016 01:30 IST2016-02-27T01:30:44+5:302016-02-27T01:30:44+5:30
वाशिम जिल्हा परिषदेतील पाच वर्षातील देयकांच्या चौकशीचे आदेश!

वैद्यकीय देयकांआड लाखोंची उलाढाल!
संतोष वानखडे / वाशिम
वारंवार वैद्यकीय देयक सादर करून जिल्हा परिषदेचे काही शिक्षक व अन्य कर्मचारी शासनाची तिजोरी संगनमताने लुटत असल्याची बाब समोर येत आहे. या प्रकाराला वेळीच आवर घालण्यासाठी गत पाच वर्षातील वैद्यकीय देयकांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दवाखान्यातील आजारपणाचा खर्च शासनातर्फे अदा केला जातो. अधिकारी-कर्मचार्यांना किंवा कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीचा हात म्हणून, दवाखान्यातील उपचार व औषधांची देयके सादर केल्यानंतर श्रेणीनुसार हजारो-लाखो रुपये दिले जातात. आजारपणात मानसिक व आर्थिक पाठबळ म्हणून शासनाची सदर योजना लाभदायी अशीच आहे; मात्र या योजनेंतर्गतची रक्कम उकळण्याचा गोरखधंदा काहींनी सुरू केल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आल्याने पाच वर्षातील सर्व वैद्यकीय देयकांची तपासणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या हालचालीचा पहिला टप्पा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पाच वर्षातील सर्व वैद्यकीय देयकांची इत्यंभूत माहिती बोलाविली असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. पाच वर्षात किती जणांनी किती वेळा वैद्यकीय उपचारार्थ देयके काढली, आजार कोणता होता, कोणत्या रुग्णालयात उपचार घेतले, यासह सर्व दृष्टिकोनातून पडताळणी होणार आहे.