वाशिम जिल्ह्यातील शहीद स्मारकांची अवहेलना कायमच !
By Admin | Updated: August 9, 2014 01:17 IST2014-08-09T01:14:00+5:302014-08-09T01:17:13+5:30
वाशिम जिल्ह्यातील शहीद स्मारकांकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील शहीद स्मारकांची अवहेलना कायमच !
वाशिम : केवळ स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिन अथवा इतर राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशभक्तींचा आव आणणारी जनता व प्रशासनाला प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य व स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्यां भारतमातेच्या सुपुत्रांविषयी फारसा आदर आहे असे वाटत नाही. जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेले शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्तंभ आदींनी ही बाब अधोरेखित केली आहे. सदर स्मारकांची आजमितीला कमालीची दुरवस्था झालेली आहे. काही स्मारकांना गवताच्या साम्राज्याने वेढले, तर काहींची पडझड झाली. काही स्मारकांना घाणीने आपल्या कवेत घेतले तर काही स्मारकांचा रंग उडाला आहे.
शिरपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जिवाचे रान करून देश स्वातंत्र्य करून दिला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात शिरपूर येथील स्वातंत्र्य सेनानी स्मारक पार दुर्लक्षित असून, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने एकप्रकारे या स्मारकाची थट्टा चालविली आहे. आजही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी या भागाची स्वच्छता करून स्वातंत्र्यासाठी झटणार्यांना मानवंदना देऊन झेंडावंदन केल्या जात आहे. या दिवसांनंतर मात्र याकडे कुणीही फिरकून पाहताना दिसून येत नाही. या स्मारकाच्या दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतने दोन वर्षाआधी ठरावसुद्धा घेतला होता तो ही कागदावरच आहे.
वाशिम जिल्हय़ातील जैनाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथे १९६0 मध्ये स्वातंत्र्य सेनानी स्मारक उभारण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक त्यावेळच्या ग्रामपंचायत प्रशासनाने उभारून येथे सभा, सामाजिक कार्यक्रम येथे असलेल्या स्मारकानजिक ओट्यावर व्हायचे. त्यावेळी शिरपूर येथे असलेले स्वातंत्र्य सैनिक आनंदराव मनाटकर, विश्णाजी पौळकर, निळकर व देशमुख यांनी स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारकासाठी पुढाकार घेतला होता. या स्मारकाजवळ वर्षानुवष्रे विविध कार्यक्रम पार पडले. गत काही वर्षांपासून या स्मारकाची अतिशय दुर्दशा होऊन सर्व पडझड झाली आहे. ठराव कागदावरच असल्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या सेनानीचे स्मारक आजही दुर्लक्षितच आहे.