बाजार समितीत आता हळदीची खरेदी!
By Admin | Updated: April 29, 2016 02:09 IST2016-04-29T02:09:59+5:302016-04-29T02:09:59+5:30
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने हळद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाजार समितीत आता हळदीची खरेदी!
वाशिम : जिल्हय़ातील शेतकर्यांनी यावर्षी मोठय़ा प्रमाणात हळद पिकांचे उत्पादन घेतल्यामुळे शेतकर्यांच्या हळदीला चांगला भाव मिळाला पाहिजे, या हेतूने वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने हळद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या या निर्णयामुळे आता बाजार समिती आवारात ५ मेपासून हळदीची विक्री सुरू होत आहे. शेतकर्यांनी हळदी पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतल्यामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद आदी शेतमालाच्या विक्रीप्रमाणेच हळदसुद्धा बाजार समितीत विकता यावी, अशी शेतकर्यांची मागणी असल्यामुळे शेतकर्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बबनराव इंगळे यांनी सांगितले. बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे व उपसभापती सुरेश मापारी यांनी २७ एप्रिल रोजी संचालक मंडळ, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीचे खरेदी-विक्री करणारे आडते व व्यापारी मंडळीसोबत याबाबत चर्चा करुन हळद वाणाची विक्री ५ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. इतर वाणाप्रमाणे हळदीचे वाण बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आल्यास स्पर्धेच्या माध्यमाने शेतकर्यांच्या हळदीला नक्कीच योग्य व जादा भाव मिळतील, परिणामी शेतकर्यांचा आर्थिक फायदा होईल. या संधीचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा व वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आणावी, असे आवाहन प्रभारी सचिव बबनराव इंगळे यांनी केले.