बाजार समिती बंदचा शेतक-यांना फटका
By Admin | Updated: October 23, 2014 01:06 IST2014-10-23T00:18:38+5:302014-10-23T01:06:36+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांची कमालीची कोंडी.

बाजार समिती बंदचा शेतक-यांना फटका
वाशिम : ऐन दिवाळीच्या मोसमातच २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर अशी सलग वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची कमालीची कोंडी झाली आहे. बहुतांश शेतकरी दरवर्षी सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करतात. यंदाही तीच परिस्थिती होती. परंतु, बाजार समिती बंद असल्यामुळे सोन्यासारखे सोयाबीन कवड्यांच्या भावात विकावे लागत आहे.
गतवर्षी अतवृष्टीमुळे शेतकर्यांचा हातातोंडाचा घास वाया गेला. यंदा विपरित हवामानामुळे पावसाअभावी सलग दुसर्यांदा खरीप हंगाम हातचा निघून गेला. प्रामुख्याने ७0 टक्के क्षेत्रावरील नगदी पीक सोयाबीन वाया गेल्याने दिवाळी व भाऊबीजचा बाजार कसा करावा? असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. अशातच कृषी उत्पन्न बाजार समितीही २१ ते २६ ऑक्टोबर अशी सलग बंद आहे. जे काही उत्पादन हाती आले ते खासगी व्यापार्यांना पडेल त्या भावात विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. जिल्ह्यात ६0 टक्के हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदाही इतर पिकांऐवजी शेतकर्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनला पसंती दिली. अधिक उत्पादनासाठी शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात खर्चही केला. एका एकरासाठी २७00 रूपयांची बॅग, ९00 ते ११00 रूपयांची खताची पिशवी मिळून ४000 रुपये लागवड खर्च लागला. दरम्यान, दोनदा खत आणि फवारणी मिळून किमान ३000 हजारांचा खर्च लागला. २७ ऑक्टोबरपासून बाजार समिती पुर्ववत सुरू होणार आहे.