मंगरूळपीर नगराध्यक्षांची निवडणूक अविरोध !
By Admin | Updated: July 12, 2014 02:11 IST2014-07-12T02:09:40+5:302014-07-12T02:11:29+5:30
नगराध्यक्षपदासाठी परळीकर यांचे एकमेव नामांकन कायम: गावंडे यांनी घेतली माघार.

मंगरूळपीर नगराध्यक्षांची निवडणूक अविरोध !
मंगरूळपीर: स्थानिक नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अनिल गावंडे यांनी दाखल केलेले नामांकन परत घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदू परळीकर यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे. परळीकर यांच्या विरोधात कुणाचेही नामांकन नसल्यामुळे त्यांची अविरोध निवड झाल्यात जमा असून, केवळ औपचारिकता उरली आहे.
येथील नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ ३0 जूनला संपला होता; परंतु शासनाने नगराध्यक्षपदाला दिलेल्या मुदतवाढीमुळे येथील निवडणूक लांबली होती. मात्र ५ जुलैला शासनाने मुदतवाढीचा हा निर्णय मागे घेतला. तेव्हापासून येथील पालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली होती. नगर परिषद प्रशासन विभागाने १४ जुलैला येथील निवडणूक घेण्याचे घोषित केले होते. त्यासाठी १0 जुलैला नामांकन अर्ज स्वीकारले. राष्ट्रवादीचे गटनेते चंदू परळीकर व शिवसेनेचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपले नामांकन दाखल केले होते. गावंडे यांच्यासोबत काही विरोधी पक्षाचे नगरसेवक दिसून आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र अचानक ११ जुलैला अनिल गावंडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी परळीकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक उरला आहे. गावंडे यांनी माघार घेतल्यामुळे परळीकर यांचा अविरोध नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १४ जुलैला केवळ सोपस्कार पार पडल्यानंतर परळीकर यांची नगराध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषण करण्यात येणार आहे.