मलिकांनी राखला वाशिमचा गड
By Admin | Updated: October 20, 2014 01:11 IST2014-10-20T01:01:50+5:302014-10-20T01:11:08+5:30
मलिक यांचा ४३९३ मतांनी विजय : दुस-या क्रमांकावर सेना, तिस-या क्रमांकावर काँग्रेस.

मलिकांनी राखला वाशिमचा गड
वाशिम : गत चार दिवसांपासून तमाम जिल्हावासीयांची उत्कंठा ताणून धरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि. १९) जाहीर झाला. यामध्ये वाशिम मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळविणार्या लखन मलिक यांनी तिसर्यांदा विजयश्री खेचून आणत भारतीय जनता पार्टीचा वाशिमचा गड कायम राखला. भाजपचे मलिक यांनी ४८ हजार १९६ मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा चार हजार ३९३ मतांनी पराभव केला.
राज्यात आघाडी व युतीचा घटस्फोट झाल्यानंतर प्रथमच वाशिम मतदारसंघातून प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. तब्बल २६८ गावांचा समावेश असलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघात एकूण २0 उमेदवार रिंगणात होते. १५ ऑक्टोबर रोजी मतदारांनी २0 उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनमध्ये बंद केले होते. विधानसभेत पोहोचण्यासाठी झुंजणार्या या शिलेदारांच्या भाग्याचा फैसला १९ ऑक्टोबर रोजी झाला. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत लखन मलिक यांना १६२३, काँग्रेसचे सुरेश इंगळे यांना १३२९, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. दीपक ढोके यांना १४0२, तर शिवसेनेचे शशिकांत पेंढारकर यांना १२३४ मते मिळाली. शेवटच्या फेरीत मलिक यांनी यांनी ४८ हजार १९६ मते घेत प्रतिस्पर्धी शिवसेनेचे पेंढारकर यांचा चार हजार ३९३ मतांनी पराभव केला.
शशिकांत पेंढारकर यांना ४३ हजार ८0३ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश इंगळे यांना ३५ हजार ९६८ मते घेत तिसर्या क्रमांकावर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. दीपक ढोके यांना २१ हजार ६८0 मते मिळाली असून ते चौथ्या क्रमांकावर राहिले. भारिप-बहुजन महासंघाचे मिलिंद पखाले यांना १३ हजार २७६ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर जाधव यांना ११ हजार ४६३ मते मिळाली. बसपाचे राहुल भगत यांना २0६0, भाकपचे संजय मडवधरे यांना १८७७, अपक्ष डॉ. अलकाताई मकासरे यांना १४0६, महादेव ताटके यांना ९२५, रमेश अंभोरे यांना ४४0, शिवाजी इंगोले यांना ६४५, देवलाल बोर्डे यांना २४८, धाम वानखडे यांना २0४, नारायण पडघान यांना ४६२, परमेश्वर वाळवे यांना ४३0, भागवत रनबावळे यांना ७३६, रामचंद्र वानखेडे यांना ६९८, सुभाष देवहंस ६३१, संतोष खंदारे यांना ४८१ अशी मते मिळाली. सर्वांंत जास्त मते मिळवणारे भाजपचे मलिक यांना चार हजार ३९३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.