मालेगाव येथे भरदिवसा अडीच लाखांची चोरी
By Admin | Updated: February 12, 2015 00:49 IST2015-02-12T00:49:04+5:302015-02-12T00:49:04+5:30
अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

मालेगाव येथे भरदिवसा अडीच लाखांची चोरी
मालेगाव (वाशिम) : येथील रामनगरमध्ये राहत असलेले जगदीश सोनोने यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी ११ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
जगदीश सोनोने हे माणका येथे जि.प. शिक्षक आहेत. ते ११ फेब्रुवारी रोजी धुळे येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांची पत्नी भारती जगदीश सोनोने ११ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घराला कुलूप लावून जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपल्या लहान मुलासोबत गेल्या. मोठा मुलगा शाळेत गेला होता. बँकेचे काम आटोपून गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त असलेल्या महाप्रसादासाठी त्या गेल्या. त्यानंतर ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी परत गेल्या तेंव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.
त्यानंतर घरामध्ये गेल्या असता घरातील लाकडी कपाटसुद्धा उघडे दिसले. त्यामुळे त्यांना चोरी झाल्याची खात्री पटली. त्यांनी कपाट उघडून बघितले असता कपाटातील सोन्याची मोठी गोफ ४५ ग्रॅम, सोन्याच्या बांगडया ३0 ग्रॅम, मंगळसूत्र ५ ग्रॅम, सोन्याची लहान अंगठी १ ग्रॅम, नेकलेस ११ ग्रॅम, सोन्याचा ओम २ ग्रॅम, असे एकूण १0२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्याची किंमत २ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. तसेच नगदी रोख १ हजार रुपये असा एकूण २ लाख ५६ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी चोरून नेला. या घटनेची फिर्याद भारती सोनोने यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५४, ३८0 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे .