सत्ताधा-यांनीच ठोकले मालेगाव नगर पंचायतला कुलूप
By Admin | Updated: May 24, 2016 02:00 IST2016-05-24T02:00:58+5:302016-05-24T02:00:58+5:30
कायमस्वरूपी मुख्याधिका-यांचे पद रिक्त असल्यामुळे कामे खोळंबली.

सत्ताधा-यांनीच ठोकले मालेगाव नगर पंचायतला कुलूप
मालेगाव (जि. वाशिम): कायमस्वरूपी मुख्याधिकार्यांअभावी शहरवासीयांची कामे खोळंबली आहेत. शहरातील विकासात्मक कामांना चालना मिळण्यासाठी मालेगाव नगर पंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्यांसह नगरसेवकांनी २३ मे रोजी नगर पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
मालेगाव नगरपंचायत अस्तित्वात येऊन चार महिन्यांचा अवधी झाला आहे. अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला नाही. त्यामुळे जनतेची कामे ठप्प झाली आहेत. शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या असूनदेखील पाणी टँकर मंजूर नाही. नगर पंचायतला तीन महिन्यांमध्ये तीन प्रभारी मुख्याधिकारी लाभले आहेत. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहर विकासाची अनेक कामे ठप्प पडली आहेत. शहरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असून, कर्मचारीसुद्धा याचा गैरफायदा घेऊन कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत. प्रभारी मुख्याधिकारीे आठवड्यातील एक किंवा दोन दिवसच येत असल्याने अनेकांचे मालमत्ता कार्डबाबतचे दाखले, इतर कामे ठप्प झाले आहेत. शहरात तीव्र पाणीटंचाई असताना टंचाई नसल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविल्याने याबाबत कोणत्याही प्रकारची मदत नगर पंचायतला मिळत नाही. शहरवासीयांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम काही वार्डातील नगरसेवक स्वखर्चातून करीत आहेत. एवढे असूनसुद्धा जिल्हा प्रशासन नगर पंचायतींच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकार्यांनी केला. सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना २0 मे रोजी पत्र पाठवून २३ मेपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी केली. मुख्याधिकारी मिळाले नसल्याने २३ मे रोजी कुलूप ठोकून ठोकून लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष मीनाक्षी बाळा सावंत, गोपाल मानधने, बबनराव चोपडे, सबनुरबी सत्तार, रूपाली शशी टनमने, रेखा अरुण बळी, शीतल खुळे, गजानन सारस्कर, अफसानाबी तसलीम आदी नगर सेवक उपस्थित होते.