अपक्षांमुळे प्रमुख उमेदवारांचा ‘गोची’ !
By Admin | Updated: October 6, 2014 00:53 IST2014-10-06T00:53:48+5:302014-10-06T00:53:48+5:30
वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात बंडखोरीचे आव्हान.

अपक्षांमुळे प्रमुख उमेदवारांचा ‘गोची’ !
संतोष वानखडे /वाशिम
युती, आघाडी दुभंगल्यानंतरही बंडोबांनी व काही तगड्या अपक्षांनी निवडणूक रिंगणात उडी मारून प्रमुख उमेदवारांच्या डोक्याचा ताप वाढविला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळी सर्वांचा अंदाज चुकविणारी असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाच्या गोटात चिंता वाढली आहे. जिल्हय़ात ५७ पैकी तब्बल २९ उमेदवार अपक्ष म्हणून टक्कर देत आहेत. यापैकी चार-पाच उमेदवार ह्यनिकालह्ण पलटविण्याची क्षमता राखून असल्याने राजकीय समीकरणही अनिश्चित बनत आहे.
युती-आघाडीतील घटस्फोटाने राजकीय समीकरणं पार बदलून टाकले आहेत. युती-आघाडी दुभंगूनही संधी न मिळालेल्यांनी बंडखोरी केल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत. तर काहींनी पक्ष बदलून दुसराच झेंडा खांद्यावर घेतला आहे. परिणामी निवडणुकीत अधिकच चुरस आली आहे. काही ठिकाणी चौरंगी, तर काही मतदारसंघात बहुरंगी लढती होण्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. वाशिम जिल्हय़ातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघातून एकूण ५७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. कारंजा व वाशिममध्ये प्रत्येकी ११ तर रिसोड मतदारसंघात सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. कारंजा व वाशिम मतदारसंघात प्रत्येकी दोन अपक्ष उमेदवार ताकद बाळगून असल्याने प्रमुख उमेदवारांची ह्यगोचीह्ण होत आहे.
** असे मतदारसंघ; असे अपक्षांचे उपद्रव्यमूल्य
1) कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर तथा विद्यमान आमदार प्रकाश डहाके आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांची अपक्ष उमेदवारी राजकीय गणित बिघडविण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. दोन तगडे अपक्ष उमेदवार कशी फिल्डिंग लावतात, यावर येथील निवडणुकीचा ह्यनिकालह्ण अवलंबून राहणार आहे.
2) वाशिम मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ. अलका मकासरे व राष्ट्रवादीचे बंडखोर महादेव ताटके यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीचे चित्र अस्पष्ट ठेवले आहे. दोन प्रमुख अपक्ष उमेदवार कुणाची मते खातात आणि कुणाला अडचणीत आणतात यावरून राजकीय गणित ठरणार आहे.
3)रिसोड मतदारसंघात बंडखोरी झाली नसली तरी मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ सानप यांच्या हातात सेनेने शिवधनुष्य देत राजकीय अंदाज चुकविले आहेत. येथे शेवटच्या क्षणी जातीचे समीकरण चालले नाही तर अनपेक्षित निकालही बाहेर येऊ शकतो.